'झेंडा'चा शो ठाण्यात बंद पाडला
मुंबई
वादग्रस्त ठरलेल्या झेंड्यामागचे शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे अजून दिसत नाही. 'स्वाभीमान' गुंडाळून हा चित्रपट आज रिलीज झाला असताना ठाण्यात मात्र नाराज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कथित कार्यकर्त्यांनी हा चित्रपट बंद पाडला. राज ठाकरे यांची चुकीची प्रतिमा या चित्रपटात उभी केली असा या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.एकीकडे बेळगावात मात्र, या चित्रपटाचे फटाके लावून स्वागत करण्यात आले.
दरम्यान, या प्रकाराबाबत अवधूत गुप्ते यांनी नाराजी व्यक्त केली असून, खुद्द राज ठाकरेंनी या चित्रपटाला विरोध नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही कार्यकर्ते असे वागत असेल तर ते दुर्देवी आहे, असे सांगून कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचे म्हणणे ऐकावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज व उद्धव या दोन ठाकरे बंधूंमधील संघर्षावर हा चित्रपट आधारीत आहे. या आधी हा चित्रपट दोन्ही पक्षाच्या नेत्यांना दाखविण्यात आला होता. त्यांनी यास 'हिरवा झेंडा' दाखविला होता. मात्र, त्यानंतर नारायण राणेंवर आधारीत पात्राबाबत त्यांचे पुत्र नितेश यांनी आक्षेप घेऊन त्यात काही बदल सुचवले होते. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलून हे बदल केले होते. किमान आजपासून तरी हा चित्रपट नीट चालेल असे वाटत असताना पुन्हा विघ्न उभे राहिले आहे.
दरम्यान, मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ठाण्यातील घटनेत चित्रपट बंद पाडणारे कार्यकर्ते मनसेचे नव्हते, असे म्हटले आहे. खुद्द राज ठाकरे यांनी माझी बदनामी होऊन मराठी चित्रपटांचे भले होत असेल तर त्याला माझी काही हरकत नाही, असे म्हटले होते, खोपकर यांनी या विधानाचा दाखला देऊन आमचा या चित्रपटाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
No Response to "'झेंडा'चा शो ठाण्यात बंद पाडला"
Post a Comment