अंजू गुप्तांची अमेरिकेत बदलीची शक्यता!
नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविरुद्ध अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी रायबरेलीतील विशेष 'सीबीआय' न्यायालयात शुक्रवारी साक्ष नोंदविणार्या उत्तर प्रदेशातील 1990 च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी अंजू गुप्ता यांना सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील भारतीय दूतावासात हलविण्याची शक्यता आहे.
सैफी अब्बास रिझवी या मुस्लीम आयपीएस अधिकार्याच्या पत्नी असलेल्या 47 वर्षीय अंजू सध्या भारतीय गुप्तहेर संस्था 'रिसर्च ऍन्ड अनॅलेसिस विंग'च्या (रॉ) येथील मुख्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत.
सहा डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील वादग्रस्त मशीद पाडण्यात आली त्यावेळी अंजू गुप्ता अडवाणी यांच्या खासगी सुरक्षा अधिकारी म्हणून कर्तव्यावर होत्या. त्यामुळे त्यांना साक्ष देण्यासाठी सीबीआयने पाचारण केले होते.
अडवाणी आणि संघ परिवारातील नेत्यांनी सहा डिसेंबर रोजी उपस्थित जनसमुदायासमोर चिथावणीखोर भाषण दिल्याची साक्ष त्यांनी काल न्यायालयात नोंदविली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांना विदेशात नियुक्तीवर पाठविल्या जाऊ शकते, असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. अंजू यांना त्यांचे पती रिझवी यांच्यासह अमेरिकेला पाठविण्याची शक्यता आहे. रिझवी हे उत्तराखंडमधील 1989 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.