नरसोबाची वाडी

Posted on Thursday, June 24, 2010 by maaybhumi desk

7295_Mahasan_L कृष्णेचे भव्य पात्र, बाजूला आखीव रेखीव घाट आणि तशीच मंदिरही. आणि या सार्या चित्रमय परिसराला अधिकच चित्रमय बनवणारे टुमदार गाव ! असे सगळे बघायला मिळते ते नरसोबाच्या वाडीला.
सांगलीपासून जवळच असलेले हे गाव नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पावन झाले आहे. कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे.
इथे नृसिंह सरस्वतींनी बारा वर्ष मुक्काम केला होता. यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरुन त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना 'मनोहर पादुका' असे नाव आहे.

या पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते. याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींचेही स्मृतीमंदिर आहे. या दोन्ही मंदिरांमुळे दत्तभक्तांची इथे दर्शनासाठी रीघ लागलेली असते.

या नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते. नदीचे पात्र, घाट, देऊळ त्यामागचा औदुंबरचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातले शांत, काहीसे पारंपारिक, प्रसन्न वातावरण मनाला भावते. घाटावरच्या पाय-यांवर बसले की मधुनच मंदिरातून ऐकु येणारा घंटानाद, भाविकांची दर्शनासाठी चाललेली लगबग ह्या सा-यामध्ये आपले 'मी'पण आपोआपच गळून पडते.

या मंदिरामध्ये चातुर्मास सोडला तर दर शनिवारी श्रींची पालखी निघते. कृष्णेच्या पैलतीरावर ओखाड आणि गौखाड अशी दोन गावं आहेत. असं सांगतात की, आदिलशाहाने देवस्थानाच्या पुजेअर्चेसाठी ही इनाम दिली आहेत. यापैकी ओखाड म्हणजेच पुर्वीचे अमरापूर. ज्याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये येतो. या गावाला अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.

नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. इथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय नारायण स्वामी, काशीकरस्वामी, गोपालस्वामी, मौनीस्वामी इ. समाधी मंदिरं आहेत. या सा-यामुळे एकदा इथे येणा-याला इथली ओढ लागते हे ही खरेच. अगदी अजित कडकडेंच्याच आवाजात नरसोबाच्या वाडीचे महत्त्व सांगायचे तर -


वाट वळणांची जीवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळीयात गंगा जाहली बोलकी

हे सगळे मनोमनी पटणारे दत्तभक्त नरसोबाच्या वाडीला नियमित जातात ते यामुळेच.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "नरसोबाची वाडी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner