महामानव घडला त्‍याची कहाणी

Posted on Saturday, February 27, 2010 by maaybhumi desk

बाबांना आपल्या आयुष्याचंPrakash-Baba Amte-Sadhanatai-Mandakini भागध्येय सापडलं तोही एक किस्सा आहे. ऐश्वर्य उपभोगणार्‍या बाबांनी त्या निर्णायक क्षणी सर्व भूतकाळ फेकून दिला आणि आपलं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी देण्याचं ठरवलं. तो क्षण खूपच महत्त्वाचा होता हे नक्की. ते घडलं असं.

ती पावसाळी संध्याकाळ होती. बाबा घरी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एक माणूस पडलेला दिसला. सुरवातील त्यांना एखादं गाठोडं वाटलं. पण जवळ गेल्यानंतर हालचाल दिसली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हा माणूस आहे. त्याचवेळी कुष्ठरोगाच्या शेवटच्या टप्प्यात तो आहे, हेही जाणवलं. त्या माणसाला हात नव्हते. त्याचे शरीराचे इतर अवयवही झडून गेले होते. दिसायलाही ते दृश्य भयानक होते. ते पाहूनच बाबा घाबरले आणि त्यांनी घराकडे धुम ठोकली. 

पण पळून गेल्यानंतरही त्यांचे मन त्यांना खात राहिले. एका निराधार, रोगाने पीडीत माणसाला त्याच्या आयुष्याच्या अशा शेवटच्या टप्प्यात भर पावसात असे सोडून देणे चुकीचे आहे, असे त्यांच्या मनाला वाटत राहिले. मग ते पुन्हा त्या माणसाकडे गेले. बरोबर थोडे अन्नही घेतले होते. तेथे गेल्यानंतर त्यांनी पावसापासून त्याचा बचाव व्हावा म्हणून बांबूच्या सहाय्याने एक शेडही उभारली. तुळसीराम नावाचा तो कुष्ठरोगी बाबांनी खूप काळजी घेऊनही फारसा जगला नाही. पण जाताना त्याने बाबांचे आयुष्य मात्र बदलून टाकले.

या अनुभवाविषयी बाबांनी फार छान लिहिलेय, ते म्हणतात, ''तुळसीरामला मी पाहिले त्या क्षणी मी एवढा घाबरलो होतो की तसा अनुभव मला यापूर्वी कधीच आला नव्हता. वास्तविक मी एका भारतीय महिलेच्या सन्मानासाठी ब्रिटिशांच्या कुत्र्यांशीही पंगा घेतला होता. म्हणूनच गांधीजी मला 'अभय साधक' म्हणत. एकदा वरोर्‍यातील सफाई कामगारांनी मला गटारी साफ करण्याचे आव्हान दिले होते. तेही मी स्वीकारले होते. पण ज्यावेळी विना कपड्यातला, बोटे झडलेला कुष्ठरोगी पाहिल्यानंतर, पूर्वी कधीही नव्हतो, एवढा घाबरलो.''
त्यानंतर बाबांच्या मनात एक बाब पक्की झाली. जिथे भय असते, तिथे प्रेम नसते आणि जिथे प्रेम नसते, तिथे देवही नसतो. त्यानंतरचे सहा महिने बाबांसाठी आत्मसंघर्षाचे गेले. काय करावे ते समजत नव्हते.

कुष्ठरोग्यांसाठी काम करायचे असा निर्णय याच आत्मसंघर्षातून घेतला गेला. हा निर्णय का घेतला याची कारणमीमांसाही त्यांनी फार उत्तम केलीय. ते म्हणतात, मी कुष्ठरोग्यांसाठी काम पत्करले ते कुणाला मदत करायची म्हणून नव्हे, तर मनातील भितीची भावना काढून टाकण्यासाठी. इतरांसाठी ते काम चांगले ठरले, हा वेगळा भाग. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मला भीतीवर मात करायची होती.''

बाबांच्या या निर्णयात त्यांच्या पत्नी साधनाताईंनीही 'ममं' म्हणून साथ दिली. पण हे सगळं घडलं कसं? बाबांच्या या आत्मसंघर्षाच्या काळात साधनाताईंनी त्यांना स्पष्ट सांगितलं, 'तुम्हाला मनापासून वाटतं ते करा. तुम्हाला साथ देण्यातच मलाही माझा आनंद मिळेल.'

झालं, त्यानंतर कुष्ठरोग्यांची सेवा हेच या दाम्पत्याच्या आयुष्यातील ध्येय ठरलं. त्यासाठी मग कुष्ठरोगासंबंधी अनेक पुस्तके त्यांनी वाचली. वरोर्‍यातील कुष्ठरोग्यांच्या दवाखान्यात त्यांनी सेवा करायला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचाच एक दवाखाना सुरू केला. १९४९ मध्ये ते कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन येथे कुष्ठरोगासंदर्भात आणखी काही शिकण्यासाठी गेले. तोपर्यंत कुष्ठरोग बरा होऊ शकतो, याचा शोध लागला होता.

बाबांनी त्यासाठीची उपचारपद्धती शिकून घेतली. त्यानंतर त्यांनी वरोर्‍याच्या आजूबाजूच्या साठ गावांतील कुष्ठरोगी रूग्णांवर उपचाराला सुरवात केली. जवळपास चार हजार रूग्णांवर त्यांनी उपचार केले. पण केवळ उपचाराने भागत नव्हते. कुष्ठरोगी बरे झाले तरी त्यांना आत्मसन्मान मिळत नव्हता. त्यामुळे केवळ उपचार करून फायदा नाही. कुष्ठरोगाने केवळ शरीरावर जखमा होतात, असे नाही, तर त्यामुळे मनावरही खोल जखमा होतात, हे त्यांच्या लक्षात आले. कुष्ठरोग्यांना घरात घेतले जात नाही, चांगली वागणूक मिळत नाही. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आनंदवन उभारण्याचा निर्णय घेतला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "महामानव घडला त्‍याची कहाणी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner