संत ज्ञानेश्वर महाराज

Posted on Wednesday, June 06, 2012 by maaybhumi desk

संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठेपण सर्व संतमंडळींनी मान्य केलेले, शिरोधार्य मानलेले दिसते. ज्ञानेश्वरांचे वडील बंधू आणि आध्यात्मिक गुरु संत निवृत्तीनाथांनी अरे अरे ज्ञाना, झालासि पावन तुझें तुज ध्यान कळों आलें अशी शाबासकीची पावती ज्ञानोबांना दिली. तर धाकट्या मुक्ताईने 'तुम्ही तरोनी विश्व तारा' असा सार्थ विश्वास व्यक्त केला.
नामदेव महाराज ज्ञानोबांपेक्षा वयाने मोठे, पण तरीही ज्ञानोबा प्रथम भेटले तेव्हा नामा म्हणे सफळ माझें फळासी हें आलें प्रत्यक्ष भेटलें पांडुरंग अशा शब्दांत गौरव करून नामा म्हणे तुमच्या, चरणाचा आधार टाकील पैलपार भवनदीचा असा विश्वासही व्यक्त केला आहे.

जनाबाईंनी तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मरोनियां जावे बा माझ्याच्या पोटा यावे अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. नाथांनी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार असा आदरभाव व्यक्त करून ज्ञानराज माझी माउली एका जनार्दनाची साउली असा नातेसंबंधही सांगितला आहे.


नाथांनी एकनाथी भागवताच्या प्रारंभी क्रमाक्रमाने सर्वांना नमन करतांना वंदूं प्राकृत कवीश्वर निवृत्तिप्रमुख



ज्ञानेश्वर नामदेव चांगदेव वटेश्वर ज्यांचें भाग्य थोर, गुरुकृपा अशा शब्दांत ज्ञानोबांना निवृत्तिनाथ हे गुरु म्हणून लाभले हे त्यांचे फार मोठे भाग्य म्हणून कौतुक केले आहे. तर ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या शेवटी नमो ज्ञानेश्वरा, निष्कलंका जयाची गीतेची वाचितां टीका ज्ञान होय लोकां अतिभाविकां, ग्रंथार्थिया अशा शब्दांत ज्ञानोबांचे मोठेपण सांगितले आहे. नामदेव ज्ञानराज माझी योग्यांची माउली असे म्हणतात, तर तुकोबांनी ज्ञानियाचा राजा गुरुमहाराव म्हणति ज्ञानदेव तुम्हां ऐसे असा या ज्ञानियाच्या राजाचा गौरव आहे. निळोबांनी होतां कृपा तुझी पशु बोले वेद निर्जिव चाले भिंती महिमा अगाध अशा शब्दांतून आरती केली आहे. अमृतरायकवींनी ज्ञानेश्वरका धवसा डरकर वेद बोले म्हैसा असे कौतुक सांगितले आहे. धवसा म्हणजे ध्वज, पताका. ज्ञानोबांच्या अधिकारामुळे घाबरुन रेडा घडाघडा वेद बोलू लागला, असे अमृतराय म्हणतात. लोकगीतांतून आळंदी साधुसंतांचे माहेर असल्याचे सांगितले आहे.

आजवर या सार्‍या रचनांमध्ये अभाव होता तो समर्थांच्या रचनेचा. नुकत्याच नव्याने उपलब्ध झालेल्या समर्थांच्या रचनेमध्ये आता ज्ञानोबांची आरतीही आहे. कलियुग त्रासुनी गेले सज्जन भव उष्णें ते समयी अवतारा घेऊनि श्रीकृष्णें तोषविलें सज्जन त्या नाना प्रश्ने तेणें निरसुनि गेलें अज्ञान तृष्णें जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा मंगल आरती करितो दे स्वपद ठेवा ही आरती तीन कडव्यांची आहे. समर्थांनी ज्ञानोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन ही आरती केली असे सांगतात. ज्ञानेश्वरमाऊलींचा जन्म श्रावण कृष्णाष्टमीचा म्हणजे गोकुळाष्टमीचा. कृष्णजन्माच्या तिथीला आणि कृष्णजन्माच्या वेळीच ज्ञानेश्वरमाऊलींचा जन्म झाला. माऊलींच्या जन्माच्यावेळी मध्यरात्र होती. परिसर काळोखात बुडून गेलेला होता. ज्ञानेश्वरमाऊलींनी संजीवन समाधी घेतली ती मात्र भरदुपारी सूर्यनारायण माथ्यावर असताना दाहीदिशांत प्रकाशाचे साम्राज्य पसरलेले असताना. आपल्या जन्माच्या वेळेची परिस्थिती कोणाच्याच हातात नसते. तसेच कोणाही मर्त्य जीवाला इथून जाण्याची वेळ ठरविता येत नाही. माऊलींनी ती वेळ ठरविली, निर्धाराने पाळली. सर्व जगावर आणि मराठी भाषिकांवर अगणित उपकारकरून ऐन तारुण्यात इहलोकीची यात्रा संपविली.

त्या करुण-मंगल क्षणाचे स्मरण झाल्यावर अंत:करणाबरोबरच डोळेही भरून येतात. जीव कावराबावरा होतो, 'जो जें वांछील, तो तें लाहो प्राणीजात' अशी अखिल प्राणिमात्राच्या विश्व-विराट कल्याणाची उत्तुंग प्रार्थना करणार्‍या ज्ञानेश्वरमाऊलींचे ऋण आपण कणभरही फेडू शकलो नाही, ही जाणीव मनाला व्याकूळ करते. पुढे काय बोलणार ?

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "संत ज्ञानेश्वर महाराज"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner