राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा उत्साहात
मुंबई
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित सत्तेचाळीसाव्या मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्याचे शानदार उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे झाले.
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, आमदार श्रीमती ऍनी शेखर, आमदार माणिकराव ठाकरे, तसेच चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावर्षी तांत्रिक विभाग व बालकलाकार विभागातील घोषित पारितोषिके पुढीलप्रमाणे : उत्कृष्ट कलादिग्दर्शन- सचिन नेवसे- अग्निदिव्य, उत्कृष्ट छायालेखन- सुधीर पलसाने- विहीर, उत्कृष्ट संकलन- सर्वेश परब- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, उत्कृष्ट ध्वनीमुद्रण- श्रीकांत कांबळे- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, उत्कृष्ट वेशभूषा- सुधीर साळुंखे- अग्निदिव्य, उत्कृष्ट रंगभूषा- हेन्री मार्टीस- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, उत्कृष्ट जाहिरात- सचिन सुरेश गुरव- पांगिरा आणि उत्कृष्ट बालकलाकार- चिन्मय कांबळी- झिंग च्याक् झिंग.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या सत्तेचाळीसाव्या मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव आनंद कुलकर्णी आणि सांस्कृतिक कार्य संचालक प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी विशेष मेहनत घेतली. रात्री उशीरापर्यत कार्यक्रम सुरू होता.
