नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरीत दोघे ठार
नवी दिल्ली
नवी दिल्लीवरून बिहारच्या दरभंगा येथे जात असलेल्या बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर झालेल्या धावपळी दरम्यान चेंगराचेंगरी होऊन त्यात किमान दोन महिला ठार झाल्या असून सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे.
नवी दिल्ली स्टेशनवरून सुटणा-या बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये जागा मिळवण्यासाठी ही धावपळ झाली. ही गाडी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून दुपारी अडीच वाजता निघते. रविवार अखेरच्या क्षणी ऐनवेळी गाडी सुटण्याचा प्लॅटफॉर्म बदलण्यात आला. रविवारी दुपारी ही गाडी स्टेशनवर दाखल होताच जनरल बोगीत जागा मिळवण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 वर धावपळ सुरू झाली. यात महिला आणि लहान मुले दाबली गेली असून एक महिला आणि लहान मुलगी या चेंगराचेंगरीत ठार झाले आहेत.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या वारसांना 1 लाख रुपये तर गंभीर रित्या जखमी असलेल्यांना 50-50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.