या मातीत जन्‍मल्‍याचा मला अभिमान- सचिन

Posted on Sunday, December 19, 2010 by maaybhumi desk

पुणे


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'मुंबई सर्वांचीच' या आपल्या विधानाचे 'प्रायश्चित्त' घेताना 'महाराष्ट्राच्या मातीत दम आहे', असे सांगून आपला महाराष्ट्राभिमान सार्वजनिकरित्या प्रकट केला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाप्रसंगी मराठीत मातीची मान उंचावणार्‍या मान्यवरांचा सत्कार केला. त्यावेळी ही संधी साधून सचिनने 'सिक्सर' मारला आहे.


काही दिवसांपूर्वीच सचिनला एका पत्रकाराने 'बाऊन्सर' टाकून मुंबईसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी मुंबई सर्वांचीच आहे, असे सांगून सचिनने बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायाने शिवसेनेचा राग ओढवून घेतला होता. कसलेला फलंदाज असला तरी 'बोलंदाज' राजकारणी नसल्याने सचिनला हा चेंडू टोलवता आला नव्हता, पण आज मनसेच्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर करून त्याने महाराष्ट्र प्रेम प्रकट केले.


राज ठाकरेंनी त्याला भवानी तलवारीसारखीच तलवारही यावेळी भेट दिली. या तलवारीला सोन्याची मूठही आहे. सचिनने ती उंचावून दाखवली. त्यानंतर राज यांनी सचिनच्या कानात सांगून त्याला बोलायला 'भाग पाडले.' या निमित्ताने सचिनने सुरवातीला अडखळत पण स्वच्छपणे आपल्या भावना मांडल्या. महाराष्ट्रात जन्मल्याचा मला अभिमान असून ती माझी संपत्ती असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्याने केला.


सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर या पूर्वसुरींना पाहूनच आपल्याला क्रिकेटचे आकर्षण वाटू लागले असे सांगून या सर्वांनी देशाचे नाव मोठे केले. या सगळ्यांमध्ये एक समानता होती, की त्यांनी आपल्या क्रिकेट खेळण्याची सुरवात महाराष्ट्राच्या मातीत केली होती. त्यावरून मी आज हे नक्की सांगू शकतो, की महाराष्ट्राच्या मातीत दम आहे, असे उद्गार सचिनने काढले. त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. 


या कार्यक्रमात सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संगीतकार अजय-अतुल, गायिका किशोरी आमोणकर, शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अनेक मान्यवरांना यावेळी गौरविण्यात आले. नृत्य-गाण्याचा अविष्कारही झाला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

latest news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner