स्वराज्याचे तोरणः तोरणा
Posted on Monday, July 18, 2011 by maaybhumi desk
photo by: wikipedia |
तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हा गाव आहे. पुणे ते वेल्हा हे अंतर साधारण साठ कि.मी. आहे. पुण्यातून कात्रज - शिवापूर - नसरापूर - वेल्हा असे जाता येते. पुणे ते वेल्हा अशा एस.टी.बसची सोय आहे. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. राजगड किल्ल्याकडून तसेच भट्टी या गावातूनही गड चढता येतो. परंतु वेल्हा येथून जाणे सोयीचे आहे.
तोरणा किल्याची उंची समुद्रसपाटीपासून १४०५ मीटर (४६०५ फूट) इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा तोरणा किल्ला असून त्याच्या ताशीव अशा सरळसोट कातळ कड्यामुळे तो बेलाग झालेला आहे. त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते.
विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये तोरणा किल्ला होता. शिवरायांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ येथेच रोवली. या किल्ल्याचा ताबा घेतल्यावर त्याची दुरुस्ती करीत असतांना मोहरांनी भरलेले हंडे शिवाजी महाराजांना मिळाले. या धनाचा वापर त्यांनी तोरण्याची दुरुस्ती आणि राजगड किल्ल्याच्या उभारणीसाठी केला. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
औरंगजेब बादशहाला तोरणा किल्ला जिंकून घ्यावा लागला. कुठल्याही भेदनितीला तोरणा बळी पडला नाही. पुढे शाहू महाराजांच्या ताब्यात व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला. भारत स्वतंत्र्य झाल्यावर हा किल्ला स्वतंत्र भारतात दाखल झाला.
वेल्हा गावाच्या पश्चिमेकडे तोरणा किल्ल्याचा एक डोंगरदांड आलेला आहे. या डोंगरदांडावरून गडावर जाणारी वाट आहे. या वाटेने साधारण दीड दोन तासामध्ये आपण तोरणागडावर पोहोचतो. वाटेमध्ये कोठेही पाणी नाही. या डोंगरदांडाने चढून आपण कातळकड्यांना भिडतो. कातळकड्यांमध्येच तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात. बिनीचा दरवाजा ओलांडून आपण पुढे गेल्यावर कोठीचा दरवाजा लागतो. कोठीच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला तोरणाजाईचे मंदीर लागते. येथेच महाराजांना मोहरांचे हंडे सापडल्याच्या नेंदी आहेत. जवळच तोरण टाळे व खोकड टाके आहे. खोकड टाक्यामधील पाणी पिण्या योग्य आहे.
या टाक्यापासून थोडे चढल्यावर आपण पोहोचतो ते बालेकिल्ल्यामध्ये. येथे मेंगाईदेवीचे देऊळ आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये उध्वस्त झालेल्या वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. दिवाणघर आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर पाहता येते. येथून एक वाट पूर्वेकडील बुरुजावर जाते. या बुरुजावरुन आसमंत उत्तमप्रकारे पाहता येतो. सिंहगड, पुरंदर, वज्रगड, राजगड, राहिडा, रायरेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड असा विस्तृत प्रदेश नजरेच्या टप्प्यामध्ये येतो. बुरुजाच्याखाली निमुळत्या दांडावर बांधलेली झुंझारमाची अप्रतिम आहे. बुरुजाच्या डावीकडून माचीवर जाणारी अवघड वाट आहे. या वाटेवर सध्या एक लोखंडी शिडी बसवलेली आहे.
मेंगाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर कड्यात मेंगाई नावाचे पाण्याचे टाके आहे. मंदिरापासूनच एक वाट कोकण दरवाजाकडे जाते. कोकणाच्या दिशेला असल्यामुळे या दरवाजाला कोकण दरवाजा असे नाव आहे. येथून बुधला माचीचे विलोभनीय असे दर्शन घडते. घसार्याच्या या वाटेने जाताना कातळात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. येथून एक वाट भगत दरवाजाकडे जाते, तर उजवीकडील वाट घोडजित टोकाकडे जाते. भगत दरवाजाकडील आणि उजवीकडील वाटेने आपल्याला राजगडाकडे जाता येते.
उजवीकडील वाटेने गेल्यावर बुधल्याचा सुळका डावीकडे रहातो. हा सुळका चढण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. खाली डावीकडे बाळणजाई दरवाजा आहे. पुढे चित्ता दरवाजा कापूरलेणे व घोडेजिनचे टोक आहे.
जॉन डग्लस या इंग्रजाने जेव्हा तोरणा पाहिला त्यावेळी त्याने sinhagarh is lions den the Torana is
Eagle`s nest असे उदगार काढले.
तोरणा किल्ल्याबाबत असलेला महत्त्वाचा उल्लेख म्हणजे हातमखानाचे पत्र. या पत्रातून तोरण्याचे जे वर्णन आले आहे ते मनोरंजक वाटेल. मोगलांनी तोरणा घेतल्यानंतर तोरण्यावर किल्लेदार म्हणून हातमखानाची नेमणूक करण्यात आली. त्याला किल्लेदारखान अशी पदवीही देण्यात आली. हातमखानाने आपला गुरू अताउल्ला याला लिहिले. त्याचा सारांश असा, ``आता मी या किल्ल्याची हकीकत सांगतो. मी साहेबजाद्यांचा निरोप घेवून निघालो. मी दुर्गम मार्ग आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यापासून टोकापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहिसा पायी चालून पार करता येईल. यानंतर स्वारासाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही. किल्ल्याच्या एका बाजूला खोल दरी आहे. ती दरी म्हणजे अलफलुस्साफलीन (सप्त पाताळातील अगदी खालचा असलेला नरक) असे वाटते. किल्ल्यावर पुढे जाण्यास वाट नाही. येथे जाण्यास डोंगरात पायर्या काढल्या आहेत. त्याही अतिशय ओबडधोबड आहेत. धडधाकट, तरुण, मजबूत आणि चपळ माणसेही त्या पायर्या चढून जाईपर्यंत काकुळतीला येतात. मग माझ्यासारख्या दुबळ्या म्हातार्याची काय कथा? या किल्ल्याची वाट अतिशय वेडीवाकडी आहे. हा किल्ला म्हणजे आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. अशा अवघड वेड्यावाकड्या वाटेने किल्ल्यावर कोणीही चढून दाखवा म्हणावे.``
स्थान : किल्ला तोरणा, ता.वेल्हा, जि.पुणे
उंची : १४०५ मीटर समुद्रसपाटीपासून
मार्ग :
१. पुणे - शिवापूर - नसरापूर - वेल्हा
2. सातारा - शिरवळ - नसरापूर - वेल्हा
पुणे व वेल्हा ६० कि.मी. सातारा ते वेल्हा १०० कि.मी.
तोरणा किल्ल्यावर राहण्याची व जेवणाची सोय नाही. पावसाळ्या व्यतिरिक्त मेंगाई मंदिरात राहता येईल. पुणे येथे राहण्याची सोय उत्तम होऊ शकेल.
१) तोरणा ! कानदखोर्यात हा गड आहे. खूप उंच, उंच, उंच ! तोरण्याइतकी उंच गड तोरणाच. डोंगरी किल्ल्यात त्याचे स्थान वडीलपणाचे. तोरणा जसा उंच तसाच रूंदही आहे. गडाला दोन माच्या आहेत. एक झुंजार माची. दुसरी बुधला माची. माची म्हणजे उपत्यका. उपत्यका म्हणजे गडाच्या एखाद्या पसरत गेलेल्या पहाडावर केलेले कोटबंद बांधकाम. झुंजार माचीपासून बुधला माचीचा शेवटचा बुरूज जवळजवळ कोसभर दूर आहे. एक कोस लांब व पाव कोस रूंद असा गडाचा पसारा आहे. बुधला माचीवर मध्यभागी एक डोंगराचा सुळका उभा आहे, व त्यावर खूप मोठा थोरला धोंडा आज शतकोशतके बसून राहिला आहे. तो दिसतो तेलाच्या बुधल्यासारखा म्हणून या चिंचोळ्या माचीला बुधला माची म्हणतात.
२) झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल खोल कडे आहेत. येथून गडाखाली उतरावयास एक वाट आहे. परंतु ती इतकी भयंकर आहे की, स्वर्गाची वाटही इतकी अवघड नसेल ! या वाटेवरून जाताना अर्धे बोट जरी झोक गेला तरीही दया-क्षमा होणार नाही मृत्यूच ! त्या दृष्टीने स्वर्गाला ती वाट फार जवळची आहे ! महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंगतीत तोरणाचा मान पहिला लागावा. काळेकुट्ट अन् ताठ भिंतीसारखे कडे, अत्यंत अरूंद वाटा, भक्कम दरवाजे, काळ्या सर्पासारखी वळसे घेत, गडावर कडेकडेने गेलेली तटबंदी. मधून मधून बांधलेले व अचूक मारा साधणारे बुरुज आणि गडाच्या मध्यावर बालेकिल्ला, असे तोरण्याचे रूप आहे!
वाचण्यासारखे आणखीही काहीः
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh