शिवछत्रपतींची आरती

Posted on Saturday, June 05, 2010 by maaybhumi desk

- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या अंगचे सर्व गुण आणि सर्व शक्ती केवळ देशभक्तीच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकर सर्वप्रथम देशभक्त होते आणि नंतर महाकवी, समाजसुधारक, लिपीसुधारक, रणझुंजार नेते होते.

सावरकरांचे हे जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या बालपणापासूनच स्पष्ट होत होते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात आर्य संघ या नावाच्या भोजन संघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हटली जावी म्हणून सावरकरांनी श्री शिवाजी महाराजांची आरती लिहिली.

आपल्याकडचे शक, संवत् हे आपल्या राष्ट्रभक्त, धर्मनिष्ठ पराक्रमी राज्यकर्त्यांच्या विक्रमी विजयाचे द्योतक आहेत. युधिष्ठिर शक हा पांडवांमधील ज्येष्ठ बंधू धर्म याने त्याच्या राज्याभिषेकानंतर स्थापन केला. तो शक सध्या ५०९९ असा आहे. विक्रमराजाचा संवत २०५३ आहे. शालिवाहन हा आपल्या महाराष्ट्रामधील राजा. त्याचा शक १९१९ आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवरायाच्या पराक्रमाचे आपण स्मरण करूया आणि सावरकरांनी लिहिलेली ही आरती मनोभावे म्हणून शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करूया.

जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....॥१॥

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......॥२॥

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........॥४॥






 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner