लोकमान्‍यांची लोकमान्‍यता

Posted on Wednesday, July 04, 2012 by maaybhumi desk

- विकास शिरपूरकर

ब्रिटीशांनी भारतावर 150 वर्षे राज्य केलं. इतकी वर्षे त्यांना आपल्याला गुलाम बनवून ठेवणे शक्य झालं कारण जातीपातीच्या धर्माधर्माच्या भिंतींमध्ये विभागला गेलेला भारतीय समाज. देशाला स्वातंत्र्य हवे असेल तर आधी या विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र आणण्याची जातीजातीमधील तेढ कमी करण्याची आवश्यकता असल्याचे लोकमान्य टिळकांनी ओळखले.


महाराष्ट्रातील हिंदू धर्मीय बांधवांना संघटित करण्याच्या उद्देशाने त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाचे सार्वजनिक पातळीवर आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

त्याकाळातल्या हिंदू समाजात धर्माबददल कमालीची उदासीनता होती. ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली राहत असताना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि संशोधनांमुळे हिंदू समाज दबला गेला होता. त्यामुळे अनेक शतके जुन्या आपल्या संस्कृतीचा आणि त्यातल्या परंपराचा भारतीय समाजाला विसर पडत चालल्याचे चित्र निर्माण झाले होते.
अशा परिस्थितीत भारत हा देश आहे आणि आपल्याला त्याच्या अस्मितेसाठी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य प्राप्त केलेच पाहिजे ही भावनाच निर्माण झालेली नव्हती. तत्कालीन गरिबी आणि अशिक्षितता हे देखील यास



कारणीभूत होते. स्वातंत्र्य लढायांच्या काळात भरकटलेल्या समाजाला एकत्र आणण्यात या उत्सवांच्या सार्वजनिक आयोजनाचा खूप उपयोग झाला. तत्कालीन महाराष्ट्राचा विचार केला तर या काळात महाराष्ट्रीयन हिंदू समाजाची रचना एखाद्या मंदिराच्या पाय-यांप्रमाणे होती. ज्या सोबत तर आहेत. मात्र एका पायरीपेक्षा दुसरी वरचढ आणि शेवटच्या पायरीचा आणि पहिल्या पायरीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

म्हणूनच मराठ्यांचे स्वराज्य व्हावे यासाठी जीवाचे रान करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही प्रत्येक समाजात आणि घरांमध्ये वेगवेगळी साजरी केली जात होती. गणेशोत्सवाचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. प्रत्येक घरात गाणा-याची स्थापना स्वतंत्ररीत्या केली जात असे.

लोकमान्यांनी या दोनही उत्सवांना ख-या अर्थाने लोकात्सव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 1894 साली पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडून विंचूरकरांच्या वाड्यांत सार्वजनिक रित्या गणेशाची स्थापना केली. हिंदू समाजातील जाती-जातींमध्ये एकसंघता यावी. भारत हे एक राष्ट्र असून या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत अशी राष्ट्रपेमाची भावना त्यांच्यात जागृत व्हावी, एकतेची जाणीव होऊन हिंदूची एक संघटित शक्ती पारतंत्र्याविरुद्ध उभी राहावी हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश होता.

लोकमान्यांनी सुरू केलेल्या त्याकाळच्या उत्सवांमध्ये केवळ शिवछत्रपती व गणयाची पूजाअर्चा होऊ लागली असे नव्हे. तर मराठी मातीतील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या भजन-कीर्तनाच्या परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गावागावांमध्ये भजन, कीर्तन, पथनाट्य यांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाऊ लागले. शाहिरांच्या पोवाड्यातून इथल्या जनतेच्या मनात राष्ट्रभावना जाग्रत होण्यासही मदत झाली. तरुणपिढीमध्ये आपल्या मातीबददल आणि संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाबददल पुन्हा अभिमान निर्माण होऊ लागला. टिळक अशा उत्सवांमधून अनेकदा समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करीत असत. त्याचाही तरुणपिढीला चांगला उपयोग झाला.

त्यांनी या उत्सवांच्या आयोजनातून हिंदू जाती व समाजामध्ये बंधुत्वाची व एकत्वाची जाणवी निर्माण केली. त्यांच्यातील सुप्त सामर्थ्याची समाजाला जाणीव करून दिली. या उपक्रमांमुळे अनेक वर्षांपासून निद्रावस्थेत गेलेला समाज पुन्हा खळबळून जागा झाला. त्यांना आपल्या अस्तित्वाची आणि आत्मसन्मानाची जाणीव झाली. या सार्वजनिक उत्सवांमधून अनेक तरुणांनी संघटित होऊन स्वातंत्र्यसमरात भरीव योगदान दिले आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner