'मूर्ती लहान, पण किर्ती महान'

Posted on Sunday, October 02, 2011 by maaybhumi desk


एक सहा वर्षांचा मुलगा आपल्या काही मित्रांसह एका बागेत शिरला. बागेतील रंगीबेरंगी फुले पाहुन मुले हरखून गेली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर ते तोडण्यास सुरूवात केली. सर्वांनी भरभरून फुले तोडली, मात्र हा मुलगा सर्वांमध्ये लहान आणि ठेंगणा असल्याने तो मागे पडला. त्याने काही फुले तोडले तोच बागेतील माळी तिथे आल्याने सर्व मुले पळून गेली. हा सहा वर्षाचा मुलगा मात्र माळ्याच्या ताब्यात सापडला. माळ्याने सर्व मुलांचा राग या मुलावर काढून त्याला मारायला सुरूवात केली.
काकुळतीला येऊन मुलगा म्हणाला, मला वडील नाहीत म्हणून तुम्ही मला मारलंत ना? मुलाचे हे बोल ऐकून माळ्याचा राग मावळला. मात्र तो म्हणाला, बेटा जर तुझे वडील नसतील तर अशा स्थितीत तु अधिक जबाबदारीने वागायला हवं. माळ्याने मुलाला सोडून दिलं, पण माळ्याच्या या एका वाक्याने मुलाचे अवघे जीवनच बदलले. केवळ कौटुंबीक जबाबदारीच नव्हे तर राष्ट्राची जबाबदारी समर्थपणे पेलणारा आणि ज्याच्या कर्तृत्वावर देशाला अभिमान वाटावा असा तो घडला. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून देशाचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री.


उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ या दिवशी लाल बहादूर श्रीवास्तव यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शारदा प्रसाद हे एक गरीब शिक्षक होते. नंतरच्या काळात ते महसूल विभागात लिपिक म्हणून कार्यरत होते. शास्त्रीजी लहान असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. अतिशय गरीबीच्या व हालाखीच्या दिवसांत दिवस काढून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरिश्चंद्र विालय आणि काशी विापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यामुळेच त्यांना 'शास्त्री' ही उपाधी मिळाली. याच काळात ते भारत सेवक संघाशी जोडले गेले. गांधीवादी विचारांनी भारावून जाऊन त्यांनी आपले संपूर्ण जीवनच या विचारांमध्ये घालविले. या काळात स्वातंत्र्य लढ्याने चांगलीच गती घेतली होती. शास्त्रीजींनीही त्यात उडी घेतली. विशेषतः १९२१ चे असहकार आंदोलन आणि १९४१ चा सत्याग्रह यात त्यांची भूमिका महत्वाची होती. या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही झाला. याच काळात पुरुषोत्तमदास टंडन, गोविंद वल्लभपंत आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक ठिकाणी सत्याग्रहांचे नेतृत्त्व केले.

१९२९ मध्ये अलाहाबाद येथे आल्यानंतर टंडन यांच्या आदेशानंतर त्यांनी भारत सेवक संघाचे काम अलाहाबादमध्ये वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली. याच काळात ते पंडित नेहरूंच्या अधिक जवळ गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना उत्तरप्रदेशच्या संसद सचिवपदी नेमण्यात आले. तर गोविंद वल्लभपंत यांच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेश सरकारचे ते पहिले वाहतूक मंत्री बनले. देशातील पहिल्या महिला वाहक (कंडक्टर) नेमण्याची कृती करणारेही ते पहिलेच. १९५१ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव बनले. १९५२, १९५७ आणि ६२ या काळात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा होता.

पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री म्हणूनही कार्यरत होते. १७ मे १९६४ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांच्या निधनानंतर शास्त्रीजींनी ९ जून १९६४ या दिवशी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणारा सैनिक आणि सीमेच्या आत देशातील जनतेची भूक भागविण्यासाठी घाम गाळून शेती करणारा शेतकरी यांना त्यांनी खर्‍या अर्थाने महत्व दिले.


त्यातूनच 'जय जवान - जय किसान' हा नारा उदयाला आला. त्यांच्या काळात भारताच्या पाक सोबतच्या युद्धात भारतीय सैन्याने मोठा विजय संपादन केला. मात्र तत्कालीन सोव्हीयत रशियातील ताश्कंद येथे झालेल्या शस्त्रसंधी करारा नंतर ते प्रचंड दुःखी झाले. ताश्कंद येथेच करारानंतर दुसर्‍या दिवशी हृदयविकाराचे दोन झटके आल्याने त्यांचा मृत्यू झाला असे समजले जाते. त्यांच्या मृत्यू संदर्भात अनेक वाद व मत प्रवाह आहेत. देशाबाहेर मृत्यू झालेले ते पहिलेच राष्ट्रप्रमुख असतील.

महात्मा गांधींनी घालून दिलेली तत्वे आणि शिकवण यावर ते आयुष्यभर ठाम राहिले. म्हणून पंतप्रधानपदावर असूनही त्यांच्याकडे स्वतःचे साधे घरही नव्हते, ही बाब आजच्या राजकीय स्थितीबाबत चिंतन करायला लावणारी आहे. त्यांना १९६६ मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले. मात्र दुर्दैवाने भारतीय राजकर्त्यांना त्यांची विचारसरणी आणि कार्याचे लवकर विस्मरण झाले.

- विकास शिरपूरकर


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner