भिवंडीत शिवसेनेचा विजयाचा 'झेंडा'!
भिंवंडी
भिवंडी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या रूपेश म्हात्रे यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार फरहान आझमी यांचा १६७६ मतांनी पराभव करत शिवसेनाप्रमुखांना वाढदिवशी विजयाची भेट दिली. मुस्लिम बहूल मतदार बहुसंख्येने असताना शिवसेनेने विजयाचा भगवा झेंडा येथे फडकावला ही बाब महत्त्वाची आहे.
रूपेश म्हात्रे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी फरहान आझमी हे समाजवादी पक्षाचे वाचाळ नेते अबू आझमी यांचे चिरंजीव आहेत. आझमी यांनी मुंबईतून मानखुर्द व भिवंडी या दोन मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मात्र, नंतर त्यांनी भिवंडी मतदारसंघाचा राजीनामा देऊन तेथून मुलाला पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र, तीन महिन्यांपूर्वी जे घडले त्याची पुनरावृत्ती आझमी करू शकले नाहीत.
म्हात्रे यांना ३५ हजार ३७६ मते मिळाली, तर आझमी यांना ३३७०० मतांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांना २४ हजार ४११ मते कमावली. गेल्या निवडणुकीत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार उभा केला होता. त्याने बरीच मते खाल्ल्याने आझमींना विजयापर्यंत पोहोचता आले होते.
आझमींनी पुत्राच्या प्रचारासाठी अमरसिंह, संजय दत्त यांनाही आणले होते. पण त्याचा उपयोग झाला नाही, हेच स्पष्ट झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे योगेश पाटील येथून विजयी झाले होते. मात्र, अबू आझमी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही जागा त्यांच्याकडून हिसकावून घेतली होती. या विजयाने शिवसेनेने तीन महिन्यांपूर्वीच्या पराभवाचे उट्टे काढले आहे.
फरहान विजयी झाले असते तर अबू आणि फरहान आझमी ही पितापुत्राची तिसरी जोडी विधानसभेत दिसली असती. सध्या छगन आणि पंकज भुजबळ व गणेश आणि संदीप नाईक ही पितापुत्राची जोडी विधानसभेत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्या निमित्त त्यांना विजयाची भेट मिळाल्याची भावना सर्वच प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेने केले बोगस व्होटिंग
शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागात बोगस व्होटिंग झाले. त्यामुळे शिवसेनेला एकगठ्ठा मतदान झाले, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार व पराभूत फरहान यांचे वडिल अबू आझमी यांनी केला आहे. त्याचवेळी पुत्राच्या पराभवात कॉंग्रेसने उमेदवार उभा करून धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन घडवून आणले, हेही एक कारण त्यांनी पुढे केले आहे. शिवसेनेचे बोगस व्होटिंग थांबविण्याची हिंमत निवडणूक आयोग व पोलिस यांचीही हिंमत नव्हती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
No Response to "भिवंडीत शिवसेनेचा विजयाचा 'झेंडा'!"
Post a Comment