मुंबईत 10 ठिकाणी '....खान' प्रदर्शित
मुंबई
राज्य सरकारकडून मल्टीप्लेक्स चालकांना सुरक्षेची खात्री देण्यात आल्यानंतर अखेर मल्टीप्लेक्स चित्रपट गृहमालकांच्या संघटनेने एक शो उशीराने म्हणजे दुपारी 12 वाजेला चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शना संदर्भात वाद होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत राज्यभरातील सुमारे 2400 शिवसैनिकांना अटक केली आहे.
आयपीएलमध्ये पाक खेळाडूंच्या बाजूने मत प्रदर्शित केल्यावरून निर्माण झालेला वाद शाहरूख खानच्या 'माय नेम इज खान'वर अडकला असून या चित्रपटाचे प्रदर्शन कुठल्याही स्थितीत होऊ न देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. चित्रपटाला शिवसैनिकांचा होणारा विरोध आणि सुरक्षेच्या कारणांमुळे तो प्रदर्शित करावा किंवा नाही या संदर्भात मल्टीप्लेक्स ओनर्स असोसिएशनच्या मालकांच्या बैठकीनंतर तो मुंबईतील फन रिपब्लिकनसह काही मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सर्वेस्व पणाला लावून तयारी केली असून मुंबईत
चित्रपटगृहांच्या सुरक्षेसाठी सुमारे 11 हजार पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर पोलिसांच्या
साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या शिवाय राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपी) 600 जवान थिएटरच्या बाहेर आणि आत तैनात करण्यात आले आहेत. तर सुमारे 2400 शिवसैनिकांना अटक करण्यात आली असून अटक सत्र सुरू करण्यात आले आहे.
मुंबई व्यतिरिक्त राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही या चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध होत असला तरीही काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपायानंतर तो प्रदर्शित करण्यात आला आहे. नागपूर शहरातील सिनेमॅक्स थिएटर वगळता इतर ठिकाणी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाला विरोधाचा वणवा राज्याबाहेरही पेटला असून मध्यप्रदेशातील इंदूर शहरात चित्रपट प्रदर्शनाला विरोध करताना शिवसेनेच्या सुमारे 45 कार्यकर्त्यांनी पोस्टर्स जाळून थिएटरमध्ये तोडफोड केली या घटनेनंतर पोलिसांनी लगेच सक्रीय होत त्यांना अटक केली आहे. तर गुजरातमध्ये या वादात विहिंप व बजरंग दलाने एन्ट्री घेतली असून कार्यकर्त्यांच्या निदर्शनामुळे अहमदाबाद शहरात चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.
No Response to "मुंबईत 10 ठिकाणी '....खान' प्रदर्शित"
Post a Comment