ऑल इज नॉट वेल...
- विकास शिरपूरकर
आमच्या लहानपणी आम्ही शाळेत रोज सकाळी एक प्रतिज्ञा घोकत असू... 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...' ही प्रतिज्ञा आता बदलावी लागते की काय असं गेल्या काही दिवसांपासून मला राहून-राहून वाटतं आहे. माझ्या काना-मनात गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्र माझा देश आहे. सारे मराठी माझे बांधव आहेत...' अशा ओळी घुमताहेत. यात 'मुंबई फक्त महाराष्ट्राची आहे' अशी आणखी एक ओळ अधिक जोराने म्हणण्यासाठी
अधोरेखित केल्याचे भयानक स्वप्नही मला हल्ली पडू लागलं आहे.
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एक विचित्र परिस्थिती सध्या उभी राहीली आहे. मुंबईवर फक्त मराठी माणसाची असं म्हणणा-यांचा एक (किंवा दोन) गट विरुध्द मुंबईवर हक्क सर्वांचाच असा दावा करणा-यांचे अनेक गट असा विचित्र संघर्ष सध्या सुरू आहे. दुस-या गटात राजकीय पक्षांचे नेते, उद्योगपती आणि बॉलीवुड स्टार्स तर पहिल्या गटात ठाकरे एण्ड कंपनीचे शिवसेना व मनसे हे दोन पक्ष. आपआपल्या स्वार्थी राजकारणासाठी खेळल्या जात असलेल्या या मुंबई कार्डात सर्व सामान्य मुंबईकरांची भूमिका काय हे जाणून घेण्यात मात्र कुणालाही स्वारस्य नाही.
गेल्या पन्नास-साठ वर्षांत कधीही झाले नव्हते इतक्या टोकदार झालेल्या भाषा आणि प्रांतवादाच्या अस्मिता देशाच्या एकात्मतेलाच निशाणा बनवू पाहत आहेत. 'मुंबईवर हक्क कोणाचा' या फुटीरतेची बीजे पेरणा-या प्रश्नामुळे देशभर राजकीय झंझावात सुरू झाला आहे. स्वार्थी आणि फुटीरतेची बीजे रोवणा-या ठराविक लोकांमुळे तुमच्या-आमच्या मुंबईची मात्र जगभरात नाचक्की होते आहे. याचा विचार कुणीही करायला तयार नाही.
जगभरात आपल्या मुंबईची प्रतिमा कराची, लेबनान किंवा तालिबानच्या ताब्यातल्या अशा शहरासारखी होत चालली आहे, जिथे केव्हाही बाहेरच्या उद्योजकांना आणि पर्यटकांना टार्गेट केलं जाऊ शकतं. भाषिक आणि प्रांतिक कट्टरवाद्यांच्या हातातले असुरक्षित शहर म्हणून जगात मुंबईची ओळख होत चालली असून ही बाब सर्वांनाच अधोगतीला नेणारी आहे.
No Response to "ऑल इज नॉट वेल..."
Post a Comment