गडकरींच्या मुखातून संघ बोलला...

Posted on Thursday, February 18, 2010 by maaybhumi desk

इंदूर
भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितिन गडकरी आता पक्षाचे नवनिर्माण करू इच्छित आहेत. त्यांच्या नवनिर्माणाचा मार्गही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच मार्गावरून जातो, हे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेतील त्यांच्या आजच्या भाषणावरून दिसले.  या भाषणात त्यांनी नैतिकतेचे धडे ही दिले, शिवाय संघाच्या धर्तीवर कार्यकर्ता प्रशिक्षणासाठी वर्ग घेण्याचा मनोदयही जाहीर केला.
संघाची मुख्य ताकद स्वयंसेवक ही आहे. हे स्वयंसेवक स्वच्छ आचरणाचे असावेत नि त्यांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसावी अशी संघाची अपेक्षा असते. स्वाभाविकच संघाच्या मुशीतून तयार झालेल्या गडकरींना आपले कार्यकर्ते आणि नेतेही असेच व्हावेत असे वाटावे यात काही नवल नाही.

त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्याचे महत्त्व विदित करून कोणतीही महत्त्वाकांक्षा समोर ठेवू नये असाच सल्ला दिला. महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी कुणाच्या 'चपला' उचलण्याची गरज नाही, हेही स्पष्ट केले. 'मी कधीही कोणत्या नेत्याला दिल्लीत जाऊन उगाचच भेटलो नाही. कुणासाठी पोस्टर, कटआऊट लावले नाहीत. कुणासाठी हार, गुच्छही दिले नाहीत. तरीही मी आज या पदावर विराजमान आहे, याचा अर्थ गुणवत्तेनेही निवड होऊ शकते, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पक्षात अनेक ज्येष्ठ मंडळी असूनही आपल्या पाया पडल्या जातात. यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाया पडणे हे लाचारीचे प्रतीक असून आपला पक्ष स्वाभीमानी आहे, तिथे अशा लाचारीला थारा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वैयक्तिक आचरण स्वच्छ असावे यावरही त्यांचा भर होता. त्या आधारेच आपण 'पार्टी विथ डिफरन्स' ही आपली ओळख सार्थ करू शकतो, असेही त्यांनी सांगितले. सत्ताप्राप्तीनंतर भाजप ही ओळखच विसरून गेला होता. त्याचा प्रचारातही कुठे वापर होत नव्हता. पण आता गडकरींनी ही 'जुनी' ओळख पुन्हा साफसूफ करून लोकांसमोर आणण्याचा चंग बांधला आहे. संघात कार्यकर्त्यांचे प्रथम, द्वितीय व तृतीय असे वर्ग घेतले जातात. त्याच धर्तीवर भाजपामध्येही कार्यकर्ता व नेत्यांसाठीही असे वर्ग सुरू करण्याचा मानस त्यांनी जाहिर केला. त्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

गडकरींच्या दलित अजेंड्यामागेही संघच असल्याचे आजच्या भाषणातून जाणवले. त्यांनी काल महू या आंबेडकरांच्या जन्मस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. शिवाय एका दलित नगरसेवकाच्या घरी जेवणही केले होते. हे राहूल गांधी यांच्या दलित अजेंड्याला उत्तर म्हणून नव्हते, तर ती आपली 'राजकीय जीवननिष्ठा' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण यात जीवननिष्ठेचा उगम पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत असल्याचे आज लक्षात आले. पुण्यात वसंत व्याख्यानमालेत माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे भाषण झाले होते, त्यावेळी अस्पृश्यता हा कलंक असल्याचे सांगून ती अस्तित्वात असलेल्या समाजाला अर्थ नाही, असे विधान केले होते. त्याची आठवण काढून गडकरींनी आपल्या दलित अजेंड्यामागची खरी प्रेरणा स्पष्ट केली.
गडकरींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सामाजिक प्रकल्पाशी जोडून घेण्याचेही आवाहन केले. अशा प्रकल्पांच्या माध्यमातून सामान्यजनांपर्यंत पोहोचायचे आणि आपले विचार पोहोचवायचे हा संघाचा मार्ग आहे. तोच मार्ग अनुसरण्याचे आवाहन गडकरींनी कार्यकर्त्यांना केले.

गडकरींनी भाषणात शेवटी संघाचे स्वप्न असेलला राम मंदिराचा मुद्दाही आणला. राम मंदिर हा आमचा प्राण असल्याचे टाळ्याखाऊ वाक्य घेऊन त्यांनी संघाशी असलेली आपली निष्ठा आणखी गडद केली.

थोडक्यात, संघाने नियुक्त केलेल्या गडकरींनी संघाचाच अजेंडा आजच्या भाषणातून मांडला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "गडकरींच्या मुखातून संघ बोलला..."

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner