हॉकी वर्ल्ड कपः पहिल्याच सामन्यात 'चक दे इंडिया'
Posted on Monday, March 01, 2010 by maaybhumi desk
भारतात हॉकी विश्व करंडकास सुरूवात झाली असून सलामीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-1 ने धुव्वा उडवून तमाम भारतीयांना होळीच्या अनोखी भेट दिली आहे. सामन्यात दोन महत्वपूर्ण गोल करून संदीप सिंह या सामन्याचा हिरो ठरला.
या विजयामुळे टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. संघाच्या या विजयानंतर खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. भारत-पाकच्या या सामन्याकडे तमाम क्रिडाप्रेमींची नजर होती.
कर्णधार राजपाल सिंह याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उत्साह, जोश आणि संघ भावनेने खेळ पाकला या सामन्यात धुळ चारली आहे. भारतासाठी शिवेंद्र सिंहने 26 व्या मिनिटाला तर संदीप सिंहने 35 व्या आणि 56 व्या मिनिटाला गोल केला. त्यांना प्रभज्योत सिंहने 37 व्या मिनिटाला गोल करून सुरेख साथ दिली.
जीशान अशरफच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ सुरूवातीपासूच दबावात होता. पाकचे ट्रंपकार्ड समजले जाणारे सर्वांत अनुभवी खेळाडू आणि विश्वविक्रमी ड्रॅग फ्लिकर सोहेल अब्बास आणि स्ट्रायकर रेहान बटही फारसे फॉर्मात नसल्याने भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
भारतीय संघाने चेंडूवरील ताबा आणि मॅन टू मॅन मार्किंगमध्येही पाकला कमकुवत सिध्द केले. भारताला 17 व्या मिनिटाला पहिला पॅनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर दिवाकर रामला गोल करता आला नाही. तर दुस-यांदा 26 व्या मिनिटाला मिळालेला पॅनल्टी कॉर्नरवही संदीप सिंहला गोल करता आला नाही. मात्र अनुभवी फॉरवर्ड शिवेंद्र सिंहने रिबाउंड शॉटवर गोल करून भारताला आवश्यक विजयाचा मार्ग दाखवला.
यानंतर पाकला मिळालेला पहिला पॅनल्टी कॉर्नर अब्बासचा शॉट गोलपोस्टच्या वरून निघून गेल्याने पाकिस्तानी समर्थकांची साफ निराशा झाली. पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला संदीपने ड्रॅग फ्लिककरून गोल करून भारताला 2-0 ने आघाडी मिळवून दिली.
दुस-या सत्रातही भारतीय खेळाडू सुरूवातीपासूनच आक्रमक राहीले. 37 व्या मिनिटाला प्रभज्योत सिंहने आणखी एक गोल करून सामना पूर्ण ताब्यात घेतला.
पाकिस्तानला 48 व्या मिनिटाला मिळालेला पॅनल्टी कॉर्नर सोहेलकडून पुन्हा गोलपोस्टला धडकून परत गेल्याने पाकची पुन्हा निराशा झाली. तर या दरम्यान मिळालेले आणखी दोन पॅनल्टी कॉर्नरही वाया गेले.
तर भारतीय संघाचे ब्रह्मास्त्र म्हणून ओळख असलेल्या संदीप सिंहने 56 व्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरमध्ये दुसरा गोल करून भारताला 4-0 ची तगडी आघाडी मिळाली.
दोन मिनिटांनंतर सोहेलने पाकच्या सहाव्या पॅनल्टी कॉर्नरवरून गोल केला आणि आघाडी काही अंशी कमी केली असली तरीही तोपर्यंत खूप वेळ झाला होता. शेवटच्या दहा मिनिटात भारतीय बचाव फळी पूर्ण ताकदीने मैदानात दिसली. तर गोलकीपर पी. श्रीजेशनेही जोरदार खेळी करीत पाकच्या अपेक्षा धुळीस मिळवल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "हॉकी वर्ल्ड कपः पहिल्याच सामन्यात 'चक दे इंडिया'"
Post a Comment