रिंगा रिंगा- एक थरारक चित्रपट
Posted on Monday, March 01, 2010 by maaybhumi desk
गोव्याचा मुख्यमंत्री बनू इच्छिणारा रंगराव (अजिंक्य देव) देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेला असतो. त्याचे हे रूप त्याचा उजवा हात सिद्धार्थ (भरत जाधव)ला आवडत नसतात. तो रंगरावाच्या विरोधात पुरावे जमा करून पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब (उदय सबनीस) यांच्याकडे देतो. मात्र यामुळे भरतच्या जीवनात अनपेक्षित घटना घडते. सिद्धार्थची पत्नी मानसी (सोनाली कुलकर्णी)चे विश्वच उजाडते परंतु ती स्वतःला सावरते. रंगराव आपल्याविरुद्धचे पुरावे परत आणण्याचे प्रयत्न करतो. या कामी त्याला जॉनी (संतोष जुवेकर) आणि विश्वास (अंकुश चौधरी) मदत करीत असतात. तो नानासाहेबांवर गोळीबारही करवतो परंतु नानासाहेब त्यातून वाचतात. पुरावे परत मिळविण्यासाठी सुरू झालेल्या शह-काटशहाचा रंगतदार खेळ म्हणजे रिंगा रिंगा.
भरत जाधवने सिद्धार्थची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे. शिक्षणाच्या आयचा घोमधील पिचलेल्या बापाची भूमिका साकारलेल्या भरतने यातील गैंगस्टर सिद्धार्थची भूमिका जीवंत केली आहे. तो येथेही भूमिकेत शोभतो. अजिंक्य देव ने रंगरावची खलनायकी भूमिका जोशात केली आहे. त्याला तशीच साथ संतोष जुवेकर आणि अंकुश चौच्च्री ने दिली आहे. सगळ्यात कमालीचे आणि प्रभावशाली काम केले आहे सोनाली कुलकर्णी ने. प्रत्येक भाव-भावना सोनालीने खूपच उत्कृष्टरित्या दाखवलेली आहे. मानसीची भूमिका सोनालीसाठीच लिहिली आहे असे वाटते. सोनाली दिसलीही खूप चांगली आहे. खरे तर तिची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे. या चित्रपटाचा ती प्राण आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मानसीच्या जागी दुसर्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचारही मनात येत नाही. छोट्याश्या भूमिकेत आदिती गोवित्रीकर ने ही दर्शन दिले आहे.
या चित्रपटाची गाणी ऐका
संजय जाधव ने चेकमेटनंतर आणखी एक उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन स्टाइलिस्ट चित्रपट त्याने तयार केला आहे. हॉलीवुडचा चित्रपट पाहिल्याचा फील रिंगा रिंगा देतो. मध्ये काही वेळ चित्रपट रेंगाळतो परंतु नंतर तो सावरतो आणि शेवटपयर्ंत प्रेक्षकाला बांधून ठेवतो. अर्थात शेवटाची कल्पना काही सुजाण प्रेक्षक करू शकतात ती खरीही होतो परंतु ज्या पद्धतीने संजयने शेवट दाखवला आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन करावे लागेल. संकलक अमित पवारचेही कौतुक करावे लागेल. अर्थात हा काही मराठीतला महान चित्रपट नाही परंतु एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून याची गणना केली जाऊ शकते.
चित्रपटात दोनच गाणी आहेत ज्यांना अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. कुणाल गांजावालाच्या आवाजातील बाय गो बाय गोचे टेकिंग खूपच चांगले झाले आहे. उमेश जाधवने हिंदी चित्रपटाच्या शैलीत याचे चित्रिकरण केले आहे. त्याचप्रमाणे सुखविंदरच्या आवाजातील घे सावरून गीतही राजेश भिडवे ने वेगळ्या पद्धतीने चित्रित केले आहे. एकूणच आजच्या तरुण प्रेक्षकांना आवडेल असाच हा चित्रपट आहे.
निषाद ऑडियो व्हिज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत, निर्माते- कांचन सातपुते, शिवाबाबा नाईक, सुरेश पै. कथा-छाया-दिग्दर्शन- संजय जाधव. पटकथा-संवाद- अमोल शेटगे, गीते- गुरु ठाकुर, संगीतकार- अजय-अतुल, संकलक- अमित पवार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "रिंगा रिंगा- एक थरारक चित्रपट"
Post a Comment