‘‘याला जीवन ऐसे नाव ’’
झी मराठीवर उलगडले जाणार आगळ्यावेगळ्या जीवनाचे आगळेवेगळे अंतरंग !
प्रत्येकाचं जीवन आणि जगण्याची त-हा वेगवेगळी असते आणि बरेचदा एखाद्या अगदी सामान्य भासणा-याच्या जीवनातही काहीतरी इतकं वेगळं, इतकं असामान्य घडतं, की त्याचं जीवन एखाद्या चित्तरकथेसारखं वाटतं. एखादा भीषण धक्का, पण त्यातून सावरणं... एखादा क्रूर आघात, पण त्यातून पुढे चालत राहणं... कधी दैवानेच इतरांपेक्षा वेगळं म्हणून जन्माला घालण्यामुळे वाट्याला येणारी अवहेलना सोसत त्यातून जगत राहणं...
माझ्याच बाबतीत असं का घडलं, असा विचार करता करता इतरांच्या बाबतीत असं होऊ नये, यासाठी पाऊल उचलणं... प्रत्येकाची एक वेगळी कहाणी... यालाच तर जीवन ऐसे नाव !
वास्तवातल्या अशा अनेक सामान्यांच्या असामान्य कहाण्या आता ‘झी मराठी’वर साकारणार आहेत – ‘याला जीवन ऐसे नाव’ या अनोख्या संवादात्मक कार्यक्रमात ! आयुष्य जगताना, भोगताना, सोसताना आजवर जे जे मनात दडवून, गाडून ठेवलंय, त्या अनुभवांना वाट मोकळी करून देणारं व्यासपीठ म्हणजे हा कार्यक्रम ! खर्याखुर्या प्रेमाचं दर्शन घडवणारा पती,... एक अगतिक पिता,... फसवणुकीमुळे अवघं आयुष्य होरपळून निघालेली एक तरुणी,... अशा विविध व्यक्ती ‘याला जीवन ऐसे नाव’मध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. मूळच्या सिंधी असलेल्या कांताशी प्रेमविवाह केलेले शहाड येथील किशोर मोहिते...त्यांचा सुखी संसार सुरू असतानाच तीन वर्षांपूर्वी धनत्रयोदशीला कांताला भीषण अपघात झाला आणि ती कोमात गेली. डॉक्टरांनीही तिच्या जगण्याची आशा सोडली होती. मात्र किशोर मोहिते यांनी हार न मानता, कांताची मनोभावे सेवा सुरू केली. गेली तीन वर्षं अंथरुणाला खिळून असलेली कांता, किशोर यांच्या या अथक प्रयत्नांनी आता हळूहळू प्रतिसाद देऊ लागली आहे. तिच्या नजरेत आता ओळख जाणवू लागली आहे. शाळेत जाणारी दोन लहान मुलं, त्यांचं सगळं करून, नोकरी सांभाळून, कर्ज काढून पत्नीसाठी इतकं करणारे किशोर म्हणजे मूर्तिमंत दुर्दम्य आशावाद ! या कार्यक्रमाच्या एका भागात ते त्यांचा मुलगा जयेश आणि त्यांच्या कुटुंबीयांसह सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अंथरुणाला खिळून असलेल्या कांताची दृश्यं आपल्याला चित्रफीतीच्या रूपात पाहता येणार आहेत.
तर ‘याला जीवन ऐसे नाव’च्या आणखी एका भागात आपल्याला दर्शन घडणार आहे, पत्नीच्या छळामुळे त्रासलेल्या आणि स्वतःच्या पोटच्या मुलाला भेटण्यासाठी तळमळणा-या एका वडिलांचं...मूळचे धुळे जिल्यातील असलेले आणि मुंबईला स्थायिक झालेले पुरुषोत्तम महाजन यांना त्यांच्या पत्नीने मतभेदांमुळे सुरू केली थेट मारहाण ! पुरुषोत्तम यांनी या त्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या छळाचे अखेर छुप्या कॅमे-याने चित्रीकरणही केले, पण पत्नीकडून होणारी मारहाण हे महाजन यांचं दुःख नाही, तर त्यांना त्यांच्या शाळेत जाणा-या मुलाला फक्त एकदा भेटायचं आहे. महाजन आणि त्यांची पत्नी यांचा घटस्फोटाचा खटला न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयाने मुलाच्या भेटीची परवानगी दिलेली असतानाही त्यांची पत्नी त्यांची आणि त्यांच्या मुलाची भेट होऊ देत नाहीये.
पती-पत्नीच्या वादात त्या लहानग्याचं भावविश्वच पोरकं झालंय. पुरुषोत्तम महाजन ‘चाईल्ड राइट्स् अँड फॅमिली वेल्फेअर’ या संघटनेच्या माध्यमातून मुलाचा ताबा मिळवण्यासाठी दाद मागत आहेत. या कार्यक्रमात ते त्यांची आई व अन्य नातलगांसह, त्यांचे वकील तसेच ‘चाईल्ड राइट्स् अँड फॅमिली वेल्फेअर’ या संघटनेच्या सदस्यांसह सहभागी होत आहेत. महाजन यांना त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीचे त्यांनी छुप्या कॅमे-याने केलेले चित्रीकरण, तसंच महाजन आणि त्यांचा मुलगा यांनी एकमेकांच्या सहवासात घालवलेल्या काही छान क्षणांचं त्यांनी हॅण्डी कॅमने केलेलं चित्रीकरणही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
आणखी एका भागात आपल्यासमोर येणार आहे मुंबईची सुगंधा देवलकर... हृदयाच्या झडपांचा असाध्य आजार असलेल्या शैलेशशी सुगंधाचं अरेन्ज्ड् मॅरेज झालं, पण सुगंधाच्या सासरच्या मंडळींनी तिच्यापासून आणि तिच्या माहेरच्या माणसांपासून शैलेशचा आजार पूर्णपणे लपवून ठेवला. या फसवणुकीने विवाहबद्ध झालेल्या सुगंधाला शैलेश पती म्हणून सुख देऊच शकला नाही आणि असाध्य आजारामुळे लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्याचा मृत्यू झाला. संसाराचं सुख न अनुभवताच सुगंधाच्या नशिबी सहा महिन्यांत वैधव्य आलं. या कार्यक्रमात सुगंधा तिचा भाऊ आणि वहिनीसह सहभागी होणार आहे. तसंच लग्न करताना कोणती काळजी घ्यावी, हे या भागात स्पष्ट करणार आहेत मॅरेज कौन्सिलर सुचित्रा इनामदार !
अशीच अनेक माणसं आणि त्यांच्या जीवनाची जिवंत, खरीखुरी, असामान्य कहाणी, कधी डोळे पाणावणारी, कधी आपल्याला जगायला बळ देणारी, कधी कोणाच्या दुःखाला वाट करून देणारी...आणि या व्यक्तींशी संवाद साधून त्यांचं अंतरंग आपल्यासमोर उलगडणार आहेत, प्रसिद्ध अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका रेणुका शहाणे...हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून स्वतःचा ठसा उमटवणा-या आणि दूरचित्रवाणीवरच्या विविध हिंदी कार्यक्रमांचं सूत्रसंचालन अत्यंत प्रभावीपणे केलेल्या रेणुका शहाणे मोठ्या कालावधीनंतर दूरचित्रवाणीवर पुनरागमन करीत आहेत. विशेष म्हणजे त्या ‘झी मराठी’वर प्रथमच येत आहेत. रेणुका शहाणे यांचा मानसशास्त्राचा अभ्यास असल्याने या कार्यक्रमातल्या सहभागींच्या भावना ‘शेअर’ करण्यातून त्यांचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
कल्पनांच्या जगात आपल्यासमोर वास्तव उलगडणारा - झी मराठी निर्मित ‘याला जीवन ऐसे नाव’ हा कार्यक्रम 5 फेब्रुवारीपासून प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी रात्री 9.30 वाजता ‘झी मराठी’वर प्रक्षेपित होणार आहे.
No Response to "‘‘याला जीवन ऐसे नाव ’’"
Post a Comment