हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...

Posted on Saturday, February 19, 2011 by maaybhumi desk

भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांश राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्याला अपवाद होते. ते स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती.


मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं.


19 फेब्रुवारी 1630 या दिवशी या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा अस्त झाला. जिजाऊ ही शिवबाजी केवळ जन्मदात्री नव्हती तर त्यांची ती स्फूर्ती, प्रेरणा, मार्गदर्शिका व मायेची सावली होती. 

जिजाऊंचे पुत्रप्रेम अजोड होते, तर शिवरायांची मातृभक्ती अपरंपार होती. पराक्रमी व कर्तृत्वान अशा आदर्श मातेचे छत्र शिवरायांना लाभलं. शिवबाच्या मातृभक्तीचं प्रत्यय यावं यासाठी एका प्रसंगाची आठवण करुन देणं आवश्यक वाटते. एके दिवशी शहाजीराजे शिवबासह विजापूरच्या आदिलशहांना भेटण्यासाठी गेले होते. शहाजींनी बादशाहाला मुजरा केला. शिवबा मात्र ताठ मानेनं बादशहांना न्याहाळीत होता. शहाजी शिवबांजवळ गेले आणि बादशाहाला मुजरा करण्यास सांगितले. परंतु शिवबा नि:स्तब्ध होते. जिजाउंची शिवबाला शिकवण होती की, प्रणाम करायचा तो फक्त माता-पिता व परमेश्वराला. हीच शिकवण आत्मसात करुन शिवबांनी सुलतानाला मुजरा करण्यास नकार दिला. खरं तर शहाजीराजेंची अवज्ञा करण्याचा शिवबाचा हेतू नव्हता. योग्य नसलेल्या माणसाला मुजरा नाकारला, यात शिवबाचं काय चुकलं, असा प्रतिसवाल जिजाऊंनी शहाजीराजेंना या घटनेवर चर्चेदरम्यान केला. आईसारखे परमदैवत दुसरं नाही, हे शिवबाच्या मातृभक्तीने सिद्ध केलं.


जिजाऊंची शिकवण
शिवबाला युद्धतंत्रांचे शिक्षण देण्यासाठी जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. तलवार चालविणे, तिरंदाजी करणं, लढाईचे आराखडे तयार करणे, मैदानावरील तसेच डोंगरी मुलूखावरील लढाई कशी करायची याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं. जिजाऊंनी शिवबाला रामायण-महाभारताच्या कथांच्या माध्यमातून रामाचा पराक्रम, भीमार्जुनाचे युद्धकौशल्य, युधिष्ठीरची धर्मनिष्ठा, पृथ्वीवरील दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीकृष्णाने वापरलेली कुटील-नितीची शिकवण दिली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे छत्रपतींना हिंदवी स्वराज्याचा राजा बनवायचा. शिवबाला छत्रपती बनविण्यासाठी जिजाऊंनी प्राणपणाला लावले.

शिवरायांचा राज्यभिषेक

जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न 1674 साली अखेर प्रत्यक्षात उतरलं. ६ जून १६७४ रोजी जिजाऊचा शिवबा छत्रपती झाला. काशीच्या गागाभट्टांकडे या सोहळ्याचे पौराहित्य सोपविण्यात आलं होतं. 6 जून 1674 रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. छत्रपतींना तोफांची सलामी देण्यात आली. सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वी महाराजांनी मातोश्रींच्या चरणी वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजाऊंच्या डोळांचं पारणं फिटलं. आपल्या हातानं शिवरायांची दृष्ट काढत जिजाऊ म्हणाल्या, शिबवा, तू महाराष्ट्राचा राजा झालास, रयतेचा राजा झालास. शिवबांचा राज्याभिषेक 'ह्याच देही ह्याच डोळा' पहावा यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत आवळून ठेवला होता. कारण राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या दहा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.





 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा..."

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner