परळी वैजनाथ
'जवा आगळं काशी' म्हणजे काशीपेक्षाही जवभर श्रेष्ठ अशी ख्याती असलेले ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ. बारा ज्योतिलिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथाचे इतर ठिकाणांहून जास्त महत्व आहे.
वैजनाथ म्हणजे खरे तर वैद्याच्या भुमिकेत इथे असणारा शंकर त्यामुळेच श्रेष्ठ ठरला आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ठिकाण अंबाजोगाई पासून १६ कि.मी. अंतरावर आहे.
वैजनाथाचे मंदिर हेमाडपंती आहे आणि एका टेकडीवर वसले आहे. या मंदिरात जाण्यासाठी घाटासारख्या पायर्या चढून जावे लागते. मुख्य मंदिर शंकराचे असले तरी या मंदिर परिसरात विष्णू, अंबा भवानी, मुरलीधर, गोपीनाथ, कासाराम, तुकाई, काळंकाई इत्यादी मंदिरे आहेत. याशिवाय एक गणपतीचे आगळंवेगळं मंदिर आहे. नेहमीसारख्या पोट सुटलेल्या लांब सोंडेचा गणपतीऐवजी इथला गणपती चक्क मल्लाच्या रुपाने आपल्याला दर्शन देतो.
हा गणपती अजुनही दार अडवून बसला आहे असे वाटते. कारण या गणपतीचे दर्शन घेऊनच मग वैजनाथाचे दर्शन घ्यायचे असते. फक्त इथेच महादेवाचा पार्वतीसह वास आहे आणि सोबत गणपतीही. परळीचा वैजनाथ हा असा कुटुंबवत्सल आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या मंदिरात एरवी गाभारा सभामंडपापेक्षा काहीसा खोल असतो पण इथे गाभारा आणि सभामंडप एकाच पातळीत आहे. गाभार्याला चार दरवाजे आहेत. स्वयंभू शिवलिंग मंदिरात असून ते शाळीग्राम शिळेचे आहे. ही पिंडी हातभर उंच आणि सुमारे दोन हात व्यासाची आहे. इथला महादेव वैजनाथ का झाला याची एक दंतकथा इथे सांगितली जाते. देवांनी आणि राक्षसांनी समुद्रमंथन केले. या मंथनातून हातात अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी प्रगट झाले. या अमृतावर देवांचा आणि राक्षसांचाही डोळा होता. राक्षसांपासून अमृत वाचवायचे तर धन्वंतरींना कुठेतरी लपवणे आवश्यक होते. तेव्हा धन्वंतरींना या महादेवाच्या पिंडीत लपवण्यात आले. आणि तेव्हापासून इथला महादेव 'वैजनाथ' झाला. देवांना विजय प्राप्त करुन दिल्यामुळे या स्थानाला 'जयंती' आणि 'वैजयंती' अशी नावं मिळाली.
या मंदिरात चार वेळा पूजा होते. पुजेनंतर शिवलिंगावर मुखवटा चढवतात. गाभार्यात चार नंदादीप अखंड तेवत असतात. महाशिवरात्र, नवरात्र, आणि कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा याकाळात इथे मोठा उत्सव असतो. गुढी पाडव्याला मंदिरात समारंभपुर्वक गुढी उभारण्यात येते. यावेळी महादेवाला वस्त्रांनी दागिने आणि फुलांनी सजविण्यात येते.
आज अस्तिवात असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला आहे. मंदिराला दिशासाधन आहे. त्यामुळे विप्लव दिनाच्या दिवशी मंदिराच्या गाभार्याला असलेल्या गवाक्षातून सुर्यकिरण पिंडीवर पडतात.
दिलेला शब्द पाळलाच पाहिजे, हे शिकवण्यासाठी श्रीयाळ राजा आणि चांगुणा राणीची गोष्ट लहानपणी आपण ऐकलेली असते. तो श्रीयाळ राजा हा मुळचा परळी वैजनाथचाच, याशिवाय रामाने वनवासाला जातांना इथे विश्राम केला, असा उल्लेख आनंद रामायणात आणि लिळाचरित्रात आला आहे.
असा हा 'वैद्यांचा वैद्य' असलेल्या वैजनाथाने आरोग्याचा मंत्र आपल्या भक्तांना देण्यासाठी परळीला वास्तव्य केले आहे. आरोग्यपूर्ण कौटुंबिक जीवनाचा धडा देणारा वैजनाथ त्यामुळे काशीपेक्षा जवभर श्रेष्ठच आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
No Response to "परळी वैजनाथ"
Post a Comment