मोरगावचा श्री मोरेश्वर
Posted on Sunday, August 07, 2011 by maaybhumi desk

क-हा नदीच्या विस्तीर्ण अशा काठावर उत्तराभिमुख असे मयुरेश्वर गणपतीचे मंदिर आहे. १४ व्या शतकात मोरया गोसावी यांनी या मंदिराची उभारणी केल्याची नोंद मिळते. विशेष म्हणजे या मंदिराची बांधणी मुसलमानी पद्धतीची आहे. मंदिराचे आवार बिदरच्या पातशाहीत जामदारखान्याचा अधिकारी असलेल्या गोळे या हिंदू अधिका-याने बांधले. मुसलमानी राजवटीत देखील मंदिराला राजाश्रय होता, हे विशेष होय. ५० फूट उंचीची तटबंदी आणि ४ कोप-यात उभे असणारे ४ खांब हे मिनाराप्रमाणे दिसतात. बिदरच्या महामूनी राजाच्या काळात बांधलेले आणि निजामशाहीत जिर्णोद्धार झाल्याचे दाखले मिळतात. घुमट आणि मनोरे यांच्यामुळे श्री मोरेश्वराचे मंदिर दुरुन एखाद्या दर्ग्यासारखी भासते.
मंदिराला असणार्या अनेक दगडी पायर्या भाविकांना पुरातनतेची साक्ष देतात. मंदिराच्या आवारात संगमरवर फरशीने मंदिराची भव्यता स्पष्ट जाणवते. दारात नगारखाना आणि मयुरेश्वराकडे तोंड केलेली एक भल्या मोठ्या उंदीराची मुर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. उंदराने आपल्या पुढील दोन पायात लाडू घेतला आहे. सभामंडपात आल्यानंतर समोर देवाचा गाभारा दिसतो. गाभा-यात मयुरेश्वराची डाव्या सोंडेची बैठी मुर्ती आहे. मयुरेश्वराच्या सर्व अंगाला शेंदूर असून डोळ्यात आणि बेंबीत हिरे चमकतात. देवाच्या मस्तकावर नागराजाने फणा पसरलेला आहे. मुर्तीच्या शेजारी दोन्ही बाजूना रिद्धी-सिद्धी यांच्या पितळी मुर्ती दिसतात. पूजा केलेली दुर्वा वाहिलेली मयुरेश्वराची मुर्ती पाहिल्यानंतर भाविकांच्या मनात श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. परिसरातील प्रसन्न वातावरण आवारातील धार्मिकता यामुळे दूरुन दर्शनासाठी आलेल्या दर्शकाला क्षणभर का होईना सुखाचा एक क्षण अनुभवायला मिळतो. म्हणूनच की काय समर्थ रामदासांना गणेशभक्तांसाठी 'सुखकर्ता दुखहर्ता' सूचला असावा. अष्टविनायक यात्रेची सुरवात श्री मोरेश्वराच्या दर्शनाने करण्याची प्रथा आहे.
वाचण्यासारखे आणखीही काहीः
travel and tourism
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "मोरगावचा श्री मोरेश्वर"
Post a Comment