बॉलीवूडचा ठाकूरः संजीव कुमार

Posted on Sunday, August 07, 2011 by maaybhumi desk

-विकास शिरपूरकर

हिंदी चित्रसृष्टीतील सशक्त अभिनेत्यांच्या यादीत संजीव कुमार यांचे नाव नेहमीच वरच्या स्थानी राहील. या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली.

9 जुलै 1930 ला सूरतमधील एका गुजराती कुटुंबात जन्मलेला हरिहर जरीवाला आपल्या अभिनयाच्या बळावर जगाला संजीव कुमार म्हणून परिचित आहे. सुमारे 25 वर्षांच्या (1960-85) मोठ्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 150 पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

1971 मध्ये आलेल्या 'दस्तक’ आणि 1973 ची ‘कोशिश’या चित्रपटांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. या शिवाय 'शिखर'(1968) मध्ये सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता, ‘आँधी’ (1975) आणि ‘अर्जुन-पंडित’ (1976)साठी सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणूनही 3 फिल्मफेअर पुरस्कारांनीही संजीव कुमारला सन्मानित



करण्यात आले. त्यांनी 1960 साली आलेल्या ‘हम हिंदुस्तानी’या चित्रपटात केवळ दोन मिनिटांच्या भूमिकेतून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. 1962 मध्ये राजश्री फिल्म्स कंपनीने ‘आरती’या चित्रपटात नायकाच्या भूमिकेसाठी त्यांची ऑडीशन घेतले मात्र त्यांची निवड करण्यात आली नाही.

सुरुवातीला त्यांनी काही बी 'ग्रेड'चित्रपटातूनही भूमिका केल्या. पण 1968 मध्ये 'संघर्ष'या चित्रपटातून अभिनय सम्राट दिलीप कुमारला टक्कर दिली आणि त्याक्षणी त्यांच्याकडे चित्रपटसृष्टीची नजर वळली.

चित्रपटसृष्टीत स्टारडम ही संकल्पना त्याकाळात नुकतीच रुजू झालेली होती. राजेश खन्ना हा बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार समोर आला. तर‘एंग्री यंग मॅन’च्या रूपात अमिताभ बच्चनने सामान्य माणसांच्या समस्या आणि संघर्षाला वाचा फोडली. आणि त्यांच्याही आधी देव आनंद या पहिल्या स्टाइल गुरुचा बॉलीवूडमध्ये समावेश झाला होता. अशा संक्रमणाच्या काळात संजीव कुमार या सर्वांपेक्षा वेगळे ठरत, शांतपणे आपल्या मार्गाने जात आपल्या एका वेगळ्या स्थानी जाऊन पोचले. व्यावसायिक आणि ‘ऑफ बीट’ चित्रपटातील भेद मिटवून आपला वेगळा प्रेक्षक बनवित आपले स्थान पक्के करत होते. अभिनयाच्या बळावर त्यांनी आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला जो नेहमीच त्यांच्या वेगळ्या भूमिकांतील चित्रपटाची प्रतीक्षा करणारा होता.

1972 च्या‘कोशिश’चित्रपटापासून त्यांची गुलजारशी जोडी जमली. या जोडीने अनेक चांगले चित्रपट दिले. ‘कोशिश’मध्ये त्यांनी एका मूक-बधिर व्यक्तीची केलेल्या भूमिकेमुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी हे सिद्ध करून दाखविले की अभिनयासाठी संवादांची आवश्यकता नसते. केवळ डोळे आणि चेह-याच्या हावभावावरून त्यांनी जोरदार अभिनय करून दाखविला.

कोशिश, परिचय, मौसम, आँधी, नमकीन आणि अँगूर हे त्यांचे उत्कृष्ट चित्रपट आहेत. संजीव कुमार सोबत गुलजार ने मिर्झा ग़ालिब चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता मात्र संजीवच्या अकाली निधनाने ते शक्य होऊ शकले नाही.

कुठल्याही भूमिकेला त्यांनी कमी न लेखता त्यात प्राण ओतले. मग ती कोशिशमधली मुक-बधिराची भूमिका असो, 'अँगूर'मधला कॉमिक डबल रोल, 'शोले'चा लाचार ठाकुर असो किंवा 'आँधी'मधल्या महत्त्वाकांक्षी पत्नीचा लो प्रोफाइल पती. हिंदी चित्रपटात पहिल्यांदा संजीव कुमार यांनी 'नया दिन नई रात’एकाच चित्रपटात नऊ रसांची संकल्पना स्पष्ट करणा-या 9 भूमिका केल्या.

पडद्यावर आपली प्रत्येक भूमिका शब्दशः जगणा-या या कलाकाराचे व्यक्तीगत आयुष्य मात्र दुःखद होते. हेमा मालिनीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने संजीवकुमार नंतर एकाकीच राहिले.

आपण 50 वर्षांपेक्षा जास्त जगूच शकणार नाही या गोष्टीची त्यांना पूर्ण खात्री होती. कारण त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये कुणाही पुरुष 50 वर्षांपेक्षा जास्त जगू शकला नव्हता. खरोखरच त्यांचे वयाच्या 47 व्या वर्षी 6 नोव्हेंबर 1985 रोजी निधन झाले.

त्यांच्या अकाली जाण्याने आपण अनेक सशक्त भूमिकांना पारखे झालो आहोत, हे नक्की.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner