संत गाडगेबाबा

Posted on Monday, August 08, 2011 by maaybhumi desk

गाडगेबाबा जाऊन आता ४० वर्षे झाली. स्वच्छतेची, साफसफाईची बाबांना खूपच आवड होती. हातात झाडू घेऊन ते सतत साफसफाई करीत असत. गाडगेबाबा म्हणजे मूर्तिमंत कडकडीत वैराग्य ! जनसेवेसाठी सर्वार्थाने झोकून दिलेले आयुष्य, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कळवळणारी कनवाळू वृत्ती, हातात एक झाडू , झाडू नसेल तेव्हा काठी. झाडू घेऊन कुठेही घाण दिसली, कचरा दिसला की तो स्वत: दूर करावयाचा, स्वत: झाडलोट करावयाची, हा बाबांचा नियम. बाबा कोणाला नमस्कार करू देत नसत. त्यांच्या पायाला कोणी हात लावलेला त्यांना चालत नसे. त्यातही कोणी पुढे घुसून पायापर्यंत येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला हातातल्या काठीचा प्रसाद मिळे.


बाबांभोवती एक गूढतेचे वलय होते. आपल्याकडे कोणीही माणूस मोठा झाला की वेगवेगळ्या चमत्कारांच्या पताका त्याच्या नावाने उभारलेल्या जातात. तो चारचौघांसारखा नाही, हे सांगण्यासाठी त्याला दैवी अवतारांच्या पंक्तीत नेऊन बसविण्यासाठी अहमहमिका सुरू होते. गाडगेबाबा हातात फुटक्या मडक्याचा तळ घेऊन फिरत. त्यांच्या अंगावर फाटक्या चिंध्या शिवून तयार केलेला अंगरखा असे. श्रेष्ठ पुरुषांशी बाबांचे फार चांगले संबंध होते. लोकशिक्षणावर बाबा खूप भर देत. बाबांनी समाजसेवेचे फार मोठे काम केले. धर्मशाळा बांधल्या. लोकांच्या सोयीसाठी शाळा बांधल्या, रुग्णालये बांधली, नद्यांना घाट बांधले. बाबा जेथे असतील त्या गावात रात्री कीर्तन हा एक वेगळा अनुभव होतो. तो समाजसुधारणेचा एक पाठच असे.





लोकांनी जातिभेद पाळू नयेत, धार्मिक उत्सवासाठी वा नवसपूर्तीसाठी किंवा लग्नकार्यासारख्या समारंभासाठी अव्वाच्या सव्वा खर्च करू नये. ऋण काढून सण साजरे करू नयेत, या गोष्टींवर बाबांचा कटाक्ष होता आणि बाबा लोकांना सहज समजेल अशा भाषेत हे सुधारणेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवीत. सत्यनारायणाच्या कथेत साधुवाण्याची होडी सत्यनारायणाची पूजा केल्यावर पाण्यावर आली, या उल्लेखाची बाबा खिल्ली उडवीत. ते म्हणत, आपल्या सरकारला हे कसे माहीत नाही ? इतक्या बोटी बुडाल्या, सत्यनारायणाची पूजा घालून आणि देवाचा प्रसाद खाऊन त्या बोटी वर का नाही काढल्या ? देवासमोर कोंबडी, बकरी बळी देतात ते बाबांना मुळीच आवडत नसे. देवापुढे बकरे कापणार्‍यांना ते त्यांच्या तोंडावरच नावे ठेवीत. बकरीचे पिल्लू कापताना आनंद मानता मग स्वत:चे पोर गेल्यावर का रडता ? असा अगदी मर्मभेदी प्रश्न बाबा विचारीत.

हिन्दू, मुसलमान एकच आहेत, ते सांगताना बाबा अगदी लहान लहान प्रश्न विचारीत. तुमच्या रक्ताचा रंग कसा ? ' लाल '. देहत्याग केल्यावर या शरीराचे काय होते? 'माती'. जे हिन्दूंच्या शरीराचे होते तेच मुसलमानांच्या शरीराचे होते, मग हिन्दू आणि मुसलमान यात भेदाभेद कशाला? बाबांच्या अशा बोलण्याने लोक अंतर्मुख होत. त्या वेळेपुरता बाबांच्या शिकवणुकीचा जनसामान्यावर चांगला परिणाम होई, पण समाजाला शतकानुशतके पडलेले वळण चिरस्थायी बदल घडू देत नसे. समाजाचे पुन्हा ' ये रे माझ्या मागल्या ' चालूच असते.

संत एकनाथ - तुकारामापासून हे समाजसुधारणेचे व्रत आपल्या संतपरंपरेने सांभाळले आहे. आसमंतातील, परिसरातील घाणकचरा एकदा- दोनदा झाडून टाकला, तरी तो परत परत जमा होतोच. लोकांच्या मनातील कुविचारांचा कचरा आणि तण बाजूला केले, तरी परत तेथे उगवतेच. समाजमनामध्ये चांगले विचार रुजविण्याचे प्रयत्न सातत्याने चालू राहिले पाहिजेत. - असे प्रयत्न मनोभावे करणारे गाडगेबाबा वारंवार जन्म घेत नसतात हेच सत्‍य.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




1 Response to "संत गाडगेबाबा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner