बोटचेप्या भूमिकेबद्दल 'राष्ट्रवादी'ची मुख्यमंत्र्यांवर टीका

Posted on Wednesday, February 03, 2010 by maaybhumi desk

मुंबईashok chavan
मराठी लोकांसंदर्भात सातत्याने बोटचेपी भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता आपल्या सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच लक्ष्य ठरले आहेत. टॅक्सी चालकांना परमिट देण्याचा मुद्दा असो वा मुंबई कुणाची या वादात राहूल गांधीची केलेली पाठराखण या सगळ्यातून मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मराठी लोकांची भूमिका मांडलीच नाही, असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

नाशिकमध्ये कालच झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई कुणाची या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व सुनील तटकरे यांनी मुंबई सर्वांत आधी मराठी माणसाचीच असल्याचे सांगून यात वाद उत्पन्न होण्यासारखे काहीही नसल्याचे म्हटले होते. पण त्यांचे नेते मात्र मराठी माणसांसंदर्भात मात्र सातत्याने बोटचेपी भूमिका घेत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही जनतेत तोंड दाखविण्यास जागा उरत नसल्याचे चित्र आहे.

टॅक्सी चालकांना परमिट देण्यासाठी मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणे सक्तीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले. परंतु, त्यावर परप्रांतियांकडून जोरदार टीका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेऊन स्थानिक भाषा येणे गरजेचे असल्याचे सांगून ही भाषा हिंदी, गुजराती किंवा मराठी असू शकते, असे स्पष्ट केले. यातून परप्रांतियांनासुद्धा परवाने मिळू शकतील हेच दाखवून दिले.

त्यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतियांचे संरक्षण करण्यास आमचे महाराष्ट्रातील सरकार सक्षम असल्याचे तिकडे बिहारमध्ये राहूल गांधींनी सांगताच इकडे मुख्यमंत्र्यांनी लगोलग पत्रक काढून 'परप्रांतियांचे संरक्षण करण्यास सरकार सक्षम' असल्याचे सांगितले. पण त्यावर टीका होणार हे लक्षात येताच पत्रक मागे घेऊन परप्रांतियांसह सर्व जनतेचे संरक्षण करू असा बदल करण्यात आला.

या सगळ्यांतून आपल्याच लोकांविषयी मुख्यमंत्र्यांची भूमिका हिताची नसल्याचा संदेश जातो आहे, असे सांगून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "बोटचेप्या भूमिकेबद्दल 'राष्ट्रवादी'ची मुख्यमंत्र्यांवर टीका"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner