गडकरींचाही 'दहा टक्के' दलित अजेंडा

Posted on Thursday, February 18, 2010 by maaybhumi desk

इंदूर
भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितिन गडकरी यांनी हाती घेतलेला 'दलित अजेंडा' म्हणजे व्होट बॅंकेचे राजकारण नव्हे, तर ही आपली 'राजकीय जीवननिष्ठा' असल्याचे आज पुन्हा एकदा सांगितले. पण त्यांच्या दलित प्रेमातमागील खरे कारणही नंतर त्यांनीच उघड केले. भाजपला २०१४ पर्यंत सत्तेपर्यंत नेण्यासाठी दहा टक्के मतांची आवश्यकता असून ही मते दलित आणि मागास जातींमधून मिळणार आहेत, असे ते म्हणाले.


गडकरी यांनी आज तब्बल तासाहून अधिक काळ केलेल्या भाषणात अनेक मुद्यांना स्पर्श केला तरीही त्यात दलित प्रेमाचा मुद्दाच प्रकर्षाने मांडला गेला. गडकरी यांनी काल महू येथे जाऊन आंबेडकरांच्या जन्मस्थळी भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली. त्यानंतर तेथेच त्यांनी एका दलित कार्यकर्त्याच्या घरी जेवणही केले. त्यांच्या या दलित प्रेमाची चर्चा माध्यमांमध्येही झाली. शिवाय कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी यांच्या दलित प्रेमाला उत्तर म्हणूनही गडकरींचा हा अजेंडा असावा असेही बोलले गेले.

त्याचा संदर्भ देऊन त्यांनी आंबेडकरांचा गौरवपूर्ण उल्लेख आजच्या भाषणात केला. आंबेडकरांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी लढा दिला. त्याची गरज आजही असल्याचे स्पष्ट करताना अस्पृश्यता हा समाजाच्या भाळावरील कलंक आहे. तो मिटवायला पाहिजे, या माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पुण्यात केलेल्या भाषणाची आठवणही काढली.

संघाशी आंबेडकरांना जोडल्यानंतर त्यांनी आपण केलेली ही गोष्ट दलित व्होट बॅंकेसाठी केलेली नाही, हे स्पष्ट करताना समाजातील या मागास घटकाचा उद्धार ही आपली 'राजकीय जीवननिष्ठा' असल्याचे स्पष्ट केले.
एकीकडे दलित प्रेमाची भलावण करत असताना भाषणाच्या ओघात २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात भाजपचे सरकार हे आपले उद्दिष्ट असल्याचेही जाहिर केले. त्यासाठी पक्षाच्या मतांत दहा टक्के वाढ गरजेची असून ही वाढ दलित व मागासांना जवळ करून साधता येईल, हा मते मिळविण्याचा मार्गही सांगितला. एकीकडे दलित प्रेमामागे कोणतेही राजकारण नसल्याचे सांगताना सत्तेचा मार्ग दलित मतांतून जातो हेही त्यांनी सांगून टाकले. शिवाय यामागची प्रेरणा असलेल्या संघाचे अस्तित्वही त्यांनी उघड केले.

समाजातील मागासांपर्यंत पोहोचण्यासाठी अंत्योदयाचा मार्ग अवलंबिण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला एका सामाजिक प्रकल्पाशी जोडायला हवे अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.

गडकरी दहशतवाद, भारत-पाकिस्तान संबंध, काश्मीर, चीन प्रश्न, नक्षलवाद व महागाई या विषयावरही बोलले.
सरकार काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या विचारात असून त्यातून तिथे स्वातंत्र्याची आकांक्षा जागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. चीनशी आम्ही चांगले संबंध राखू इच्छितो, मात्र आपल्या देशाची जमीन गिळंकृत करण्याचे उद्योगही सुरूच आहेत. नेपाळमध्येही चिनी घुसखोरी सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नक्षलवाद्यांच्या समस्येबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. महागाईबद्दल बोलताना त्यांनी फ़ारवर्ड ट्रेडिंगच्या माध्यमातून सरकारने जीवनावश्यक पदार्थांचे भाव वाढविले असा आरोप केला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "गडकरींचाही 'दहा टक्के' दलित अजेंडा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner