जन्माने मराठी असलेल्यांनाच नोकरी मिळावी- राज

Posted on Monday, February 01, 2010 by maaybhumi desk

मुंबई
मराठीच्या नावाखाली बिहारींना मराठी शिकवण्यासारखी वाट्टेल ती आंदोलने करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांनी आज परखड शब्दांत कानउघडणी केली. जन्माने मराठी असलेल्याच प्राधान्य मिळावे, असे पक्षाचे धोरण असल्याचे सांगून कुणीही त्या धोरणाविरोधात काम करू नये असेही त्यांनी बजावले.

दरम्यान, राज पक्षांततर्गत 'झाडाझडती'साठी येत्या १३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघणार आहेत. शिवाय २१ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीच्या मुद्यावर मनसेच्या कार्यकर्त्याकडून जे सुचेल तशी आंदोलने केली जात आहेत. त्याचा राज यांनी आज घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात परखड समाचार घेतला. 'युपी, बिहारच्या मंडळींना मराठी शिकविण्यासाठी काहींनी मध्यंतरी आंदोलन केले. उद्या बिहारमध्ये जाऊन मराठी शाळा काढाल. हे सगळे पक्षाच्या धोरणाविरूद्ध आहे. जन्माने मराठी असलेल्यालाच इथे नोकरी मिळायला हवी असे आमचे धोरण आहे. पक्षाचे धोरण बदलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला सुचले म्हणून काहीही आंदोलन केलेले चालणार नाही. आंदोलन करायच्या आधी आमदार, सरचिटणीस आदी पदाधिकार्‍यांशी बोलून घ्या. त्यानंतरच आंदोलन करा,' असा सज्जड दम त्यांनी दिला. 

येत्या १३ फेब्रुवारीपासून आपण राज्याच्या दौर्‍यावर निघणार असून त्याची सुरवात सिंधुदुर्गपासून होणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. हा दौरा झाडाझडतीचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. या दौरा काळात त्यांच्या जाहिर सभा, मेळावे होणार नाहीत. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे नेते यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात गैरप्रकार झाले आहेत, अशा ठिकाणी दोन दिवस देण्यात आले आहेत. तेथील पदाधिकार्‍यांनी आत्ताच सुधारून घ्यावे असा इशाराही त्यांनी दिला. सदस्य नोंदणीतही गांभीर्य बाळगावे असे त्यांनी सांगितले.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "जन्माने मराठी असलेल्यांनाच नोकरी मिळावी- राज"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner