राहुल आणि त्‍याचे स्वयंवर!

Posted on Thursday, March 04, 2010 by maaybhumi desk

- विकास शिरपूरकर
rahul-mahajan

मराठीत एक जुनी उक्ती आहे 'पुत्र व्‍हावा ऐसा गुंडा, ज्‍याचा तिन्‍ही लोकी झेंडा' इथं गुंडा हे कर्तृत्ववान या अर्थाने आहे. प्रत्येक बापाला आपला मुलगा आपल्‍या पेक्षा अधिक कर्तृत्‍ववान व्‍हावा असे वाटते.

दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांनाही कदाचित तसेच वाटले असावे. पण वाटते ते सगळे होतेच असे नाही. प्रमोदजींचा एकुलता एक दिवटा
बीजवर आहे. एक घटस्‍फोट काही अफेयर्स आणि एक-दोन अंमली पदार्थ सेवनाच्‍या केसेस त्‍याच्‍या खात्‍यात आहेत. प्रेम विवाह केलेल्‍या राहुलने काही दिवसातच आपल्‍या पत्‍नीला घटस्‍फोट दिला आणि आता पुन्‍हा लग्‍न करायला निघाला आहे. आता तो खरोखर लग्‍न करेल की राखी सावंत सारखं लग्‍नाचं कौतुक करेल माहीत नाही पण तो सध्‍या टीव्‍हीवर दिसतो आणि गाजतोही आहे. तो 'स्वयंवधू' करणार असून या प्रकाराला चुकीने स्वयंवर संबोधले जात आहे. स्वयंवरात मुलगी आपल्‍या वराची निवड करत असते इथे मुलगा (३५ बर्षांचा) वधुची निवड करणार आहे त्या अर्थाने मग हे "स्वयंवधू"च ना?

ज्‍या महागड्या सेट्सवर राखी सावंतने स्‍वयंवरचे नाटक रचून आपल्‍या कथित जोडीदाराची निवड केली होती राहुल महाजन सुध्‍दा तिथेच हे सगळे सोपस्‍कार पार पाडणार आहे. पंधरा मुली यात सहभागी झाल्‍या आहेत आणि प्रत्येक जण दुसरी पेक्षा मोठा नमुना... आता योगायोग म्हणा हवं तर सर्वच मुली मॉडेल किंवा स्‍ट्रगलर आहेत. खरं सांगायचं तर राहुल सोबत लग्‍न करण्‍यासाठी एखादी मुलगी तयार होणं आणि रिएलीटी कार्यक्रमात येऊन संपूर्ण जगासमोर आपलं प्रेम व्‍यक्त करायचं यासाठी तो सलमान किंवा ऋतिक असण्‍याची दूर-दूरही शक्यता नाही. म्हणून या सर्व मुली यथायोग्य रक्कम देऊन बोलवल्‍या गेलेल्‍या आहेत.

त्‍यात राहुलही काही कमी नमुना नाही. त्‍याची बोलण्‍याची आणि संवाद फेकीची पध्‍दत ऐकणा-याची चांगलीच करमणूक करणारी आहे. शब्द एकमेकांवर चढतच जाणारे. काहीसे तोतरे आणि चुकीचे उच्चार ही त्याची खासियत. तर त्‍याचं हसणं महाकठीण आणि अनपेक्षित. अशा परिस्थितीत त्याच्‍या स्वयंवरमध्‍ये जर एकोणीस वर्षाची तरुणी आली असेल तर ती लग्न करायला आली आहे की टीव्‍हीच्‍या माध्‍यमातून आपली ओळख बनवून पैसे कमवायला हे सांगण्‍यासाठी कुण्‍या होरारत्नाची गरज नसावी. राहीला विषय राहुलचा, तर 'बिग बॉस'मध्‍ये काम केल्‍यानंतर त्‍याला टीव्‍हीवरून झळकायचं व्‍यसनच लागलं आहे. आपल्‍यात एक चांगला रिएलीटी शो कलाकार लपला असल्‍याचा साक्षात्‍कार त्‍याला झाल्‍याने तो वेगळ्याच जगात वावरतो आहे.

आतापर्यंतच्‍या कार्यक्रमात सर्व मुलींनी थोडे-फार नखरे दाखवत आपलं राहुलवरचं प्रेम व्‍यक्त केलं. ज्या त्यात किंवा टीआरपी वाढवून देण्‍यात कमी पडल्‍या त्‍या घरी गेल्‍या. अर्थात सर्वांमध्‍ये एक गोष्‍ट समान आहे ती म्हणजे त्‍यांच्‍या नैसर्गिकतेपक्षा कृत्रिम संवाद वाचन आणि अभिनय करण्‍याचा प्रयत्नच अधिक दिसतो.

राहुलचा वधू संशोधन कार्यक्रम उर्वरित सर्वच बेगडी रिएलिटी शोजमध्‍ये सर्वांत नकली वाटला. वेगवेगळे नाते दाखवत कधी राहुलचा भाऊ, कधी बहीण तर कधी वहीनी असे अनेक जण येऊन गेले आणि आपल्‍या परीने कार्यक्रमाला टीआरपी वाढवून दिला. आता मेहंदी, संगीत आणि विवाह सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. अर्थात ते देखिल नाटकी असेल हे नव्‍याने सांगायची गरज नाही.

Arrange your own love marriage? Register at Shaadi.com Matrimonials

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राहुल आणि त्‍याचे स्वयंवर!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner