प्रवीण महाजन यांचं निधन

Posted on Thursday, March 04, 2010 by maaybhumi desk

मुंबई

भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या प्रवीण महाजन यांचे आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजने झाल्याचे ज्युपिटर रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

11 डिसेंबर रोजी प्रवीण यांना अचानक चक्कर आली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 तारखेला ते कोमात गेले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले.

घरगुती वादातून प्रवीण यांनी प्रमोद महाजन यांचा गोळ्या झाडून खून केला होता. यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 11 डिसेंबर पूर्वी ते पॅरोलवर सुटले असतानाच त्यांना अचानक ब्रेन हॅमरेज झाले. 22 एप्रिल 2006 रोजी प्रमोद यांच्या मुंबईतील घरात प्रवीण यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

'माझा अल्बम' - प्रवीणचे पुस्तक

दरम्यान, तुरूंगात असतानाच्या काळात प्रवीण यांनी 'माझा अल्बम' नावाचे आठवणीवजा पुस्तकही लिहिले. त्याचे एक प्रकरण मुंबईतील एका वृत्तपत्राने छापल्याने खळबळही उडाली होती. हे पुस्तक प्रवीणने बंधू प्रमोद यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले होते. यात प्रमोद यांच्यासंदर्भातील काही प्रसंग वादग्रस्त ठरतील असे आहेत. प्रवीणच्या गेल्या ३० वर्षांतील आठवणी सांगणाऱ्या या पुस्तकातून महाजनांच्या कुटुंबाविषयी, त्यांचे परस्पर नातेसंबंध, राजकारण, कटू प्रसंग याविषयी उलगडा होतो. प्रवीणच्या या पुस्तकात प्रमोद केंद्रस्थानी असल्याने ‘माझा अल्बम’ने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. प्रमोद महाजनांचा खुनी म्हणून अटक झाल्यानंतर प्रवीणविषयी अनेक प्रवाद उठले होते. त्यांचे निराकरण व्हावे या हेतूने पुस्तक लिहिल्याचे त्याने या पुस्तकात म्हटले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "प्रवीण महाजन यांचं निधन"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner