हेडली, ज्यू आणि जर्मन बेकरी स्फोट!

Posted on Sunday, February 14, 2010 by maaybhumi desk

पुण्यात जर्मन हाऊसमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटात ज्यू लोकांना मुख्य लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण जर्मन बेकरीजवळच ज्यूंचे छाबड हाऊस (ज्युईश सेंटर) आहे. शिवाय ओशो आश्रमातही परदेशी नागरिक त्यातही इस्त्रायली सातत्याने येत असतात. याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेत पकडण्यात आलेला डेव्हिड हेडली या परिसरात येऊन गेला होता. इतकेच नव्हे तर या आधी जेथे जेथे तो गेला तेथे तेथे तो ज्युईश सेंटर परिसरातच राहिला होता.

हेडलीने ‘एफबीआय’कडून अटक होण्याअगोदर भारतातील पाच शहरांमधील ज्यू धर्मस्थळांवरील हल्ल्याचा नियोजनबद्ध कट केला होता, अशी माहिती उजेडात आली आहे.

मुंबईतील कफ परेड येथील इस्रायली हवाई वाहतूक कंपनीच्या कार्यालयासह इतरही ज्यू स्थळांची त्याने पाहणी केल्याचे ‘एफबीआय’ व अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. हेडलीचे मूळ नाव दाऊद गिलानी आहे. पाकिस्तानी पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या हेडलीवर ‘एफबीआय’ने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप ठेवला आहे. या हल्ल्यात सहा परदेशी नागरिकांसह १६० जण मृत्युमुखी पडले होते. मागील वर्षी २६ नोव्हेंबरला घडलेल्या या दुर्घटनेचा तपास भारतातर्फे ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी’ (एनआयए) करीत आहे.

हेडली आणि त्याचा पाकिस्तानी-कॅनेडियन साथीदार तहव्वूर राणा यांचा या हल्ल्यात असलेल्या सहभागाविषयी ही संस्था तपास करीत आहे.

या तपासकामाची जबाबदारी असणा-या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील पहाडगंज भागात मुक्काम हलविण्यापूर्वी हेडलीने कफ परेड भागातील इस्रयली एअरलाइन्सच्या कार्यालयाची पाहणी केली होती. सुरक्षा संस्थांनी या भागाला भेट दिली असता, हेडलीचा मुक्काम ज्या ‘डे हॉलिडे इन’ हॉटेलात होता, त्यापासून ज्यूंचे धर्मस्थळ असलेले ‘ छाबड हाऊस’ केवळ ३०० मीटर अंतरावर आहे. पहाडगंजमधील ‘छाबड हाऊस’ही अरुंद गल्लीत असून इस्रयली पर्यटक धरमशाला अथवा भारताच्या पश्चिम भागात जाण्यापूर्वी इथे मुक्काम करणे पसंत करतात. हेडलीने या स्थळाची पाहणी करताना ज्यू असल्याचे भासवले होते.

दिल्लीतून हेडली राजस्थानातील पुष्कर येथे गेला. तेथील हॉटेलात मुक्काम करण्यापूर्वी त्याने ज्यू धर्मस्थळासमोरील खोलीचा आग्रह धरला होता. आपण ज्यू असल्याने या पवित्र जागेचे दृष्य डोळ्यांसमोर असावे, असे कारण त्याने या वेळी दिले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही हेडलीने ज्यू धर्मस्थळासमोरील खोलीचाच आग्रह धरल्याचे सांगितले आहे. तिथे तीन दिवस मुक्काम केल्यानंतर तो गोव्यात गेला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या अंजुना गावातील एका ‘गेस्ट हाऊस’मध्ये तो राहिला. मग त्याने पुण्यातील कोरेगाव पार्क भागात काही काळ घालविला. ओशो आश्रमात येणारे परकीय पर्यटक त्याचे लक्ष्य असावेत, असे आधी वाटले होते. पण, नंतर केलेल्या तपासातून त्याने ही जागा त्या भागात असणाऱ्या ज्यू धर्मस्थळाची टेहळणी करण्यासाठी निवडल्याचे निष्पन्न झाले होते. जर्मन हाऊसजवळच छाबड हाऊस आहे. पुण्यातून तो मुंबईत आला. तिथे त्याने पाकिस्तानात जाण्यापूर्वी इस्रयली एअरलाईन्सच्या कार्यालयाचीही पाहणी केल्याचे सुरक्षा संस्थांच्या तपासातून उघड झाले होते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




1 Response to "हेडली, ज्यू आणि जर्मन बेकरी स्फोट!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner