ऋतिकची काईट्स भिडलीच नाही!

Posted on Friday, May 21, 2010 by maaybhumi desk


बॅनर : फिल्मक्रॉफ्ट प्रोडक्शंस प्रा.लि.
निर्माता : राकेश रोशन
दिग्दर्शक : अनुराग बसु
संगीत : राजेश रोशन
कलाकार : ऋतिक रोशन, बार्बरा मोरी, कंगना, निक ब्राऊन, कबीर बेदी, यूरी सूरी
यू/ए * 14 रिळ * 2 तास 8 मिनिटे


काईटसची कथा अगदी साधी आहे. त्यात कोणतेही नाविन्य नाही. हजारो वेळा अशी कथा आपण पडद्यावर पाहिली आहे. पण या कथेचे पडद्यावरील सादरीकरण मात्र फार वेगळे आहे.

दिग्दर्शक अनुराग बसूने या कथेला पडद्यावर एक वेगळीच उंची गाठून दिली आहे. पूर्ण चित्रपटाला इंटरनॅशनल लूक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, तीक्ष्ण संपादन आणि भव्यता या जोरावर या फिल्मचे उत्तम पॅकेजिंग केले गेले आहे.

लास वेगासमध्ये रहाणारा जे (ऋतिक रोशन) पैशासाठी ग्रीन कार्ड मिळविण्यास उत्सुक असणार्‍या कोणत्याही मुलीशी लग्न करण्यास तयार असतो. ११ वे लग्न तो मेक्सिकोहून लास वेगासला पैसे कमाविण्यासाठी आलेल्या नताशा-लिंडा (बार्बरा मोरी) हिच्याशी करतो.


करोडोपती असलेला आणि कॅसिनोचा मालक असलेल्या कबीर बेदीची मुलगी जिना (कंगना) हिला जे डान्स शिकवतो. जिनाचे त्याच्यावर प्रेम आहे. पण जेला तिचा पैसा हवा आहे. तोही तिच्याशी प्रेमाचे नाटक करतो.

तिकडे नताशा जिनाचा भाऊ टोनीशी (निक ब्राऊन) लग्न करण्यास उत्सुक आहे. टोनीची श्रीमंती हे तिच्या लग्नाचे कारण आहे. पण नताशा आणि जेची एकदा गाठ पडते नि दोघेही परस्परांच्या प्रेमात पडतात. लग्नाच्या एक दिवस अगोदरच नताशा जे बरोबर पळून जाते. टोनी आणि त्याच्या वडिलांना हा अपमान वाटतो आणि ते दोघांच्या मागे लागतात. या दोघांना संपवून बदला घेण्याचा त्यांचा इरादा असतो. या ते यशस्वी होतात काय? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

काईट्सची गाणी ऐका

  Powered by     eSnips.com 

या कथेत काहीच वळणे नाहीत, अगदी सरळसोट आहे हे लगेचच कळते. कथेत त्रुटीही बर्‍याच आहेत. श्रीमंत घरातील सदस्य अगदीच रस्त्यावरील लोकांशी लग्न करण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतात हे कळण्यापलीकडे आहे. पैशाला प्राधान्य देणारा जे व नताशा अचानक प्रेमासाठी कुणाशीही झगडायला कसे काय तयार होतात के कळत नाही. पण केवळ या कथेचे सादरीकरण उत्तम असल्याने या त्रुटींकडे दुर्लक्ष करता येते.

चित्रपटात फ्लॅशबॅकचा वापर फार प्रभावीपणे केला आहे. फ्लॅशबॅकनंतर प्रसंग पुन्हा प्लॅशबॅक यामुळे गोंधळ उडतो खरा, पण हे तंत्र प्रभावी आहे हे नक्की. चित्रपटात संवाद कमी आहेत. कारण जे आणि नताशा दोघांनाही परस्परांची भाषा येत नाही. पण तरीही त्यांच्यातले प्रेम लोकांच्या ह्रदयाला स्पर्शून जाते. परंतु, संवाद इंग्रजी, हिंदी व स्पॅनिशमध्ये आहेत. मल्टिप्लेक्समध्ये इंग्रजीत व सिंगल स्क्रीनमध्ये हिंदीत सब टायटल दिले आहेत. इंग्रजीत बरेच संवाद असल्याने अनेक जण या चित्रपटाकडे पाठ फिरवू शकतात.

बाकी एडिटिंग नेमके आहे. गती वेगवान असल्याने विचाराला फारसा वेळ मिळत नाही. ह्रतिक रोशन हॅंडसम दिसतो. त्याचा अभिनयही बघण्यासारखा आहे. स्क्रिप्टमधील त्रुटी झाकोळून तो चित्रपटभर वावरतो, हे महत्त्वाचे आहे. बार्बरा मोरी त्याच्यापेक्षा मोठी वाटते. परंतु, तिचा अभिनय अव्वल आहे. शिवाय दोघांची केमिस्ट्री मस्तच जुळली आहे. कंगना आणि कबीर बेदी यांच्याकडे करण्यासारखे फारसे काही नव्हते. निक ब्राऊनचा खलनायकही उत्तम.

राजेश रोशनचे जिंदगी दो पल आणि दिल क्युं ये मारे ही गाणी ऐकण्यासारखी आहेत. तांत्रिकदृष्ट्या हॉलीवूडच्या दर्जाचा हा चित्रपट बनला आहे. सलीम-सुलेमानचे बॅकग्राऊंड म्युझिकही उत्तम आहे. अयनंक बोसची सिनेमॅटोग्राफी छान आहे.

काईटसच्या कथेवर मेहनत घेतली असती तर मात्र हा सर्वांगसुंदर चित्रपट नक्कीच बनला असता. पण तरीही सामान्य कथेला असामान्य तर्‍हेने पेश कसे केले आहे, ते पाहण्यासाठी काईटस पहायला हरकत नाही.

रेटिंग : 3/5

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner