चक्रीवादळाचं नावं कसं ठरतं?

Posted on Wednesday, May 19, 2010 by maaybhumi desk

- विकास शिरपूरकर
 
लैला नावाच्‍या चक्रीवादळाने सध्‍या भारतीय किनारपट्टीवर धुमाकूळ घातला आहे. लैलाच्‍या या तडाख्‍याने अनेक संसार रस्‍त्‍यावर आले तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेल्या कॅटरीना वादळानेही तेथील नागरिकांना रस्त्यावर आणलं होतं. हे कमी की काय म्हणून त्यापाठोपाठ आलेल्‍या रीटा वादळानेही अमेरिकन किनारपट्टीतील प्रदेशाची वाट लावली होती.

अगदी दोन-तीन महिन्‍यांपूर्वी महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीला आपली फक्त झलक दाखवून जाणार्‍या फयान चक्रीवादळाला मुंबईकर आणि कोकणवासीय विसरलेले नाहीत. तसे त्याला लक्षात ठेवणे फारसे कठीणही नाही, कारण या वादळाचे फयान हे नावच चमत्कारीक आहे. प्रत्येक वादळाला नाव देण्याचा, त्यात सुरस नाव द्यायचा प्रघात तसा जुनाच म्हणजे, गेल्या शतकभरातला आहे. गंमतीची बाब म्हणजे, वादळाचे बारसे करण्यासाठी काही सर्वमान्य आंतरराष्ट्रीय संकेतही आहेत.


नाव देण्‍याचं कारण

वादळांना विशिष्ट नाव देण्याचे मुख्‍य कारण म्हणजे, वादळा संदर्भात राष्ट्रा-राष्ट्रात माहितीची देवाण-घेवाण करण्‍यासाठी मदत होणे हे आहे. ही देवाणघेवाण होत असताना एकाच वादळाला जर विविध नावाने संबोधले गेले तर घोळ निर्माण होऊ शकतो. अफवांना देखील ऊत येऊ शकतो. म्हणूनचं वादळ निर्माण होणार्‍या व त्याच्या प्रभावाखाली येणार्‍या भौगोलिक प्रदेशातील देशांकडून सामायिकपणे एखाद्या सांकेतिक नावाचा वापर माहितीचे आदानप्रदान करताना केला जातो.

भारताने २००४ सालात उत्तर हिंदी महासागरात येणार्‍या वादळांना नावे देऊन या परंपरेला सुरूवात केली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना नावे देताना भारतीय हवामान खाते भारतीय उपखंड परिसरातील अन्य देशांच्या वेधशाळांशी संपर्क करते. ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलँड या देशांशी संपर्क करून सर्वांच्या संमतीने एखादे नाव निश्चित केले जाते.

मुख्‍यतः कमी ताकदीच्‍या वादळाला स्त्रीच्‍या नावावरून तर अधिक क्षमतेच्‍या वादळाला पुरुष नाव ठेवले जाते.

आताच्‍या लैला या वादळाचे नाव पाकिस्‍तानने दिले आहे. तर नुकत्याच झालेल्या फयान वादळाचे नाव म्यानमारच्या सुचनेवरून देण्यात आले होते. तर मे २००९ मध्ये बंगालच्या उपसागरात झालेल्या वादळाला आयला असे चमत्कारीक नाव देण्यात आले होते.

नावांचा इतिहास

वादळांना अशाप्रकारे नावे देण्याची परंपरा २० व्या शतकापासून सुरू झाली. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने याची सुरूवात केली मात्र १९५३ पासून अमेरिकन हवामान खात्याने सध्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या नावांनी वादळाचा नामकरण विधी पार पाडण्यास सुरूवात केली. अनेक राष्ट्रे नावे निवडताना प्रख्यात सिनेनटी, त्या देशातील काही सुप्रसिद्ध अथवा बदनाम व्यक्तींची नावेही वापरतात. सर्वसामान्यपणे वादळांची विध्वंसक शक्ती त्यांचे बारसे करताना लक्षात घेतली जाते.

त्‍यानंतर 1970 च्‍या दशकात वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गेनाइजेशनने वादळांच्‍या नावांचे आरक्षण करण्‍यास सुरूवात केली. 

भविष्‍यातील वादळांची काही नावे

काही महिन्‍यांपूर्वी महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीला धडकलेल्‍या फयान या वादळाचे नाव म्यानमारने दिले होते. 'फयान'चा अर्थ झाडांवरून पडणारी चेरी. तर त्‍यानंतर आलेल्‍या लहान वादळाचे 'वार्ड' हे नाव ओमानने निश्चित केले होते. आताचे 'लैला' हे नाव पाकिस्‍तानने दिलेले असून पुढच्‍या वादळाला श्रीलंकेने दिलेले 'बंदू' हे नाव असणार आहे. त्‍यानंतर थायलँडचे 'फेट' हे नाव उपयोगात आणले जाईल. नंतर बांग्‍लादेशचे 'गिरी' व भारताचे 'जल' हे नाव वापरले जाणार आहे. भारताने लहर, मेघ, सागर, वायु ही नावेही आरक्षित करून ठेवली आहेत. तर पाकिस्तानने लैला, नीलम, नीलोफर, बर्दाह, तितली, बुलबुल नाव आरक्षित करून ठेवली आहेत. अशा प्रकारे या आठ देशांनी सुमारे 64 नावे आरक्षित करून ठेवली आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner