विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १० जूनला मतदान
मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक गुरुवार दि. १० जून २०१० रोजी होणार असून विधान परिषदेच्या दहा रिक्त जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या निवडणुकीत विधानसभेचे २८८ सदस्य मतदान करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधान मंडळाचे प्रधान सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी अनंत कळसे यांनी गुरूवारी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी मुंबईत विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी सुभाषचंद्र मयेकर उपस्थित होते. श्री.कळसे पुढे म्हणाले की, गुरुवारी (१० जून) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून मतदानानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
निवडणूक आयोगाची पूर्वअनुमती घेतल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार निलंबित सदस्यांनाही मतदानाचा संविधानिक हक्क आहे. त्यामुळे ते मतदान करु शकतात, असे श्री.कळसे यांनी यावेळी स्पष्ट केले. ही निवडणूक एकक संक्रमणीय पद्धतीने घेण्यात येणार असून मतदान करण्यासाठी व्हॉयलेट रंगाचे स्केचपेन वापरणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती दीप्ती चवधरी, संजय दत्त, हुसेन दलवाई, रामराजे नाईक-निंबाळकर, अनिल परब, श्रीमती शोभाताई फडणवीस, प्रकाश बिनसाळे, धनंजय मुंडे, विनायक मेटे, दिवाकर रावते आणि विजय सावंत हे ११ उमेदवार ही निवडणूक लढवणार आहेत.