राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी 'झेंडा'!
नवी दिल्ली
केंद्र सरकारकडून जाहिर केल्या जाणार्या चित्रपटविषयक राष्ट्रीय पुरस्कारात मराठी झेंडा फडकला असून या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार जोगवा या मराठी चित्रपटाला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून उपेंद्र लिमये आणि संगीतकार म्हणून अजय-अतुल यांची निवड झाली आहे.
मधूर भांडारकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या फॅशन या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियंका चोप्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. गंध या मराठी चित्रपटाच्या पटकथेबद्द्ल सचिन कुंडलकर यांना उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.
५६ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहिर झाले. रॉक ऑन या चित्रपटातील भूमिकेसाठी अर्जुन रामपालला सहाय्यक अभिनेत्याचा तर फॅशनमधील भूमिकेसाठी कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
राहूल बोस अभिनित अंतहीन हा बंगाली चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. 'रॉक ऑन' हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. प्रादेशिक चित्रपटांच्या विभागात जोगवा चित्रपटाची व द वेन्सडे या चित्रपटाची उत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषणा करण्यात आली आहे. लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार दिवाकर बॅनर्जी यांच्या 'ओय लकी लकी ओय'ला मिळाला आहे. मुंबई मेरी जान या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स'साठी गौरविण्यात आले.
संगीतात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून श्रेया घोषाल, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून हरिहरन यांची निवड झाली. सर्वोत्कृष्ट एनिमेशन चित्रपट म्हणून रोडसाईड रोमियोला गौरविण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट संपादनासाठी फिराक तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून गुबाची गानू याची निवड करण्यात आली.
राजन गवस यांच्या भंडारभोग या कादंबरीवर आधारीत असलेला हा चित्रपट राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केला होता. त्यात जबरदस्तीने जोगत्या बनवलेला तरूण एका जोगतिणीच्या सानिध्यात येतो आणि त्यांच्यात पुलणारा प्रेमाचा अंकूर आणि समाजाचा त्यांच्या प्रेमाला मिळणारा प्रतिसाद असा या चित्रपटाचा विषय आहे.
No Response to "राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी 'झेंडा'!"
Post a Comment