बॉक्‍स ऑफीसवर धारातीर्थी पडलेला 'वीर'

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत, विजय गालानीज मूवीज प्रोडक्शन
निर्माता- विजय गालानी,
दिग्दर्शन- अनिल शर्मा, img1100122050_1_2
कथा- सलमान खान,
संगीत- साजिद वाजिद, गीतकार- गुलजार.
कलाकार- सलमान खान, जरीन खान, सोहेल खान, मिथुन चक्रवर्ती, नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ.

सलमान खानने कथा लिहिलेली असल्याने वीरबद्दल प्रचंड उत्सुकता होती. हॉलीवुडच्या तोडीचा भव्य चित्रपट बनवण्याचा दावाही सलमान खानने केला होता. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर जाणवते ही वीर म्हणजे रत्जडीत कपड्यांनी सजवलेले निर्जीव शरीर आहे. उत्कृष्ट सेट, भरजरी पोशाख, हजारों घोडे, प्रचंड मोठी रणभूमी. चांगले कलाकार, परंतु एवढे सगळे असले तरी मुळात
कथानकातच दम नसल्याने चित्रपट सुरुवातीची दहा मिनिटे सोडली तर कुठेच मनाची पकड घेत नाही. चित्रपटातील घटना दूर कुठेतरी सुरू आहेत असेच वाटत राहाते.

माधवपुरचा राजपुत्र जॅकी श्रॉफ दुसर्‍या राजापासून आपले राज्य वाचवण्यासाठी आदिवासी पिंढारींची मदत घेतो. त्याबदल्यात तो त्यांना त्यांची जमीन देणार असतो. पिंढारीच्या मदतीने युद्ध जिंकले जाते परंतु पिंढारीना जमीन न देता इंग्रजांच्या मदतीने तो पिंढारींवर हल्ला करतो. यात हजारो पिंढारी प्राण गमावतात. उरलेले पिंढारी दुसरीकडे जातात मात्र माधवपुरवर कब्जा करण्याचे त्यांचे स्वप्न असते. पिंढारीचा शूर वीर पृथ्वी (मिथुन चक्रवर्ती) बदला घेण्यासाठी प्रयत्न करीत असतो. पृथ्वीचा मुलगा वीर (सलमान खान) पित्याप्रमाणेच शूर असतो.

पृथ्वी वीर आणि दुसरा मुलगा पूरनला (सोहेल खान) इंग्लंडला शिकण्यास पाठवतो. तेथे माधवपुरची राजकुमारी यशोधरा (जरीन खान) आणि वीरमध्ये प्रेमकथा फुलते. वडिलांचे माधवपुरवर कब्जा करण्याचे वचन पूर्ण करीत आपले प्रेम वीर कसा प्राप्त करतो आणि देशासाठी प्राणत्याग कसे करतो त्याची कथा म्हणजे वीर.

सलमान खानने वीरची भूमिका नेहमीप्रमाणेच जोषात केली आहे. तो वीरच्या भूमिकेत शोभूनही दिसतो. संपूर्ण चित्रपट सलमाननेच व्यापलेला आहे. जरीन खान सुंदर दिसण्याचे काम मनापासून केले आहे. सोहेलने सलमानच्या भावाची भूमिका साकारली आहे ज्यामध्ये काहीही दम नव्हता. जॅकी श्रॉफ, पुरु राजकुमार यांनी छोट्याशा भूमिका साकारल्या आहेत. मिथुन चक्रवर्तीने पृथ्वीच्या भूमिकेत खूपच चांगले काम केले आहे. सुरुवातीची दहा मिनिटे तर मिथुन प्रेक्षकांना बांधण्याचे काम केले आहे. भरत दाभोळकर यांनी एक्स्ट्रा कलावंताची भूमिका का केली ते समजत नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्माने पिटातल्या प्रेक्षकांना नजरेसमोर ठेऊन केले आहे. थोड्या थोड्या वेळानंतर टाळ्या कशा पडतील, सलमानचे शरीरसौष्ठव कसे दिसेल याची पूर्ण काळजी अनिल शर्माने घेतली आहे. अनिल शर्माने मेहनत तर घेतली परंतु आडातच नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार? कथानकातच दम नसल्याने चित्रपट पकडच घेत नाही. सलमान लंडनमध्ये गेल्यानंतर चित्रपट रेंगाळतो तो शेवटपर्यंत. अनिल शर्माने गदर, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अपने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असल्यामुळे सलमानने अनिल शर्माला संधी दिली.

चित्रपटाच्या काही दृश्यांवर पाइरेट्स ऑफ कॅरेबियनची छाप दिसते. १८६२ ते १९२० चा काळ, लढ़ाईची दृश्ये त्याने चांगल्या पद्धतीने पडद्यावर उतरवले आहे. मात्र जोधा अकबर वा मोगले आजमची सर त्याला येत नाही. गोपाल शाह यांचे चित्रिकरण सुंदर आहे. साजिद-वाजिद यांच्या संगीतात काहीच दम नाही.

चांगले कलाकार, भव्यता असूनही मनाची पकड घेत नसल्यामुळे एकूणच सलमानचा वीर तिकीटखिड़की वर काही करामत करेल असे वाटत नाही.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "बॉक्‍स ऑफीसवर धारातीर्थी पडलेला 'वीर'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner