विठु माऊलीचे पंढरपूर
पंढरपूर! फक्त महाराष्ट्राचेच लाडके कुलदैवत आहे असे नव्हे तर लगतच्या कर्नाटकालाही या सावळ्या विठ्ठलाने आपलेसे केले आहे. पंढरपूर महाराष्ट्राचे कुलदैवत. `माझे माहेर पंढरी` ही महाराष्ट्राच्या प्रत्येकाची भावना. पंढरपूर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. याठिकाणी जाण्यासाठी बस आणि रेल्वेची सुविधा आहे.
भिमा नदी पंढरपूर जवळ येताच जणू या शहराला प्रेमाने कुरवाळायला निघाल्यासारखी चंद्राकृती होते म्हणून भिमेचे नाव इथे चंद्रभागा. गावाच्या मध्यवस्तीस विठ्ठलाचे पुर्वाभिमुख मंदिर आहे. या मंदिराच्या पुर्वद्वाराला महाद्वार आणि मंदिराच्या पहिल्या पायरीला नामदेवाची पायरी म्हणतात. नामदेव महारांजानी इथे समाधी घेतली. त्यामुळे ही पायरी नामदेवाची पायरी. या मंदिराच्या डाव्या हाताला तेहतीस कोटी देवतांचे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात जवळपास २५ छोटी-मोठी मंदिरं आणि समाध्या आहेत. ते बघितले की, विठू माझा लेकुरवाऴा हे आपसुकच पटते. या मंदिरात रूक्खमाई विठ्ठलाबरोबर नाही तिचे वेगळे मंदिर आहे. याशिवाय राई आणि सत्यभामा यांचीही मंदिर आहेत. आषाढी एकादशीला दिंड्या नाचवत वारकर्यांचे मेळे विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी पंढरपूरला येतात. गेली शेकडो वर्ष महाराष्ट्र ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपत आहे. आश्चर्य म्हणजे वर्षागणिक ही गर्दी वाढतेच.
विठ्ठलाचे नैमित्तीक आणि नियमित पुजोपचार असतात. सकाळी भुपाळी म्हणून काकडआरतीने या नियमित पुजेची सुरुवात होते. याशिवाय उन्हाळा, हिवाळा या ऋतुनुसारही नैवेद्य आणि पुजेत बदल केले जातात.
दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ठ्ठिलाची महापुजा बांधली जाते. जसे लोक तसा देव हे विठ्ठलाला भेटले की पटते. मेहनती, रांगडा आणि साधासुध्या मराठी माणसाचा देवही तसाच त्याच्याच वेषातला साधासुधा आहे. आणि कदाचित म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला विठ्ठलाचे वेड आहे.
दरवर्षी शेकडो मैल चालून या वाळवंटात खेळ मांडायला हे लोक पंढरपूरला येतात. अभिमान गेला वावटळी, एकसभा लागतील पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी ठायी, असे मन नकळतच गुणगुणु लागते.
No Response to "विठु माऊलीचे पंढरपूर"
Post a Comment