पंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र

Posted on Saturday, July 17, 2010 by maaybhumi desk

भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. या पंढरीच्या दरबारात नेमके काय आहे याचा वेध तर घेऊया.


विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर जवळच आहे. मंदिर पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप-यात आहे.

आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत.

जवळच्याच दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. पुढे चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमान' नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता, असे सांगितले जाते. तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. वास्तविक विठोबा हा शैव आणि वैष्णव या दोन्हींचा समन्वय साधणारा असूनही असा प्रकार घडला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner