इश्किया- इश्क किया
Posted on Sunday, January 31, 2010 by maaybhumi desk
निर्देशक : अभिषेक चौबे
संगीतः विशाल भारद्वाज
कलाकार : नसीरुद्दीन शाह, अरशद वारसी, विद्या बालन, सलमान शाहिद
विशाल भारद्वाजचा सिनेमा म्हणजे काही तरी हटके पहायला मिळणार ही अटकळ बांधून 'इश्किया' पहायला गेल्यानंतर त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतात. वास्तविक हा चित्रपट विशाल कॅम्पचा चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन अभिषेक चौबेने केले आहे. पण मकबूल, ओंकाराची पटकथा लिहिणार्या अभिषेकने आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल टाकत सिनेमाची योग्य वाट चोखाळली असल्याचे इश्किया पाहून वाटते.
चित्रपट लिहिला आहे, विशाल भारद्वाज आणि चौबे आणि सब्रिना धवन यांनी. इश्किया हा प्रेमाचा त्रिकोण आहे. पण तुम्ही आजपर्यंत असा त्रिकोण नक्कीच पाहिलेला नसेल.
अंकल खालुजान (नसीरूद्दीन शहा) आणि त्याचा पुतण्या बब्बन (अर्शद वारसी) दोघेही चोर आहेत. आपल्या टोळीप्रमुखाला चुना लावून या दोघांनी पळ काढलेला आहे. आता त्यांना निवारा हवा आहे. त्यासाठी ते आपल्याच एका दिवंगत मित्राचे घर गाठतात. त्या घरात त्या मित्राची विधवा बायको कृष्णा (विद्या बालन) रहाते आहे. इथूनच प्रेमाचा त्रिकोण बांधला जातो. भावनांचे बंध जुळतात. वासनांचे गंध फैलावतात. गुन्हेगारीची काळी छटा या सगळ्यातून कुठेही सुटत नाही. हा सगळा खेळ अतिशय पहाण्यासारखा आहे. खालुजानला कृष्णाचे आकर्षण वाटायला लागते, तर बब्बन कृष्णाशी संग करण्यास आतुर झालेला असतो. कृष्णा मात्र दोघांनाही छान खेळवते. पण यामागे तिचेही काही अंतस्थ हेतू असतात...
हे सगळं काल्पनिक असलं तरीही ते आजूबाजूला घडतं हा फील चित्रपट देतो. सुरवातीला चित्रपटाची भाषा नि प्रदेश यांच्याशी जुळायला थोडा वेळ लागतो. पण नंतर मात्र छान सूर लागतो. या सबंध चित्रपटाला एक नर्मविनोदी झालरही चौबे यांनी दिली आहे. तितकेच चुरचुरीत संवाद विशाल भारद्वाजने लिहिले आहेत. चित्रपटाचा दुसरा हाफ थोडा लांबला आहे. पण तरीही पूर्ण चित्रपट बांधून ठेवणारा आहे.
मोहक दिसणारी विद्या बालन कृष्णाच्या भूमिकेत अगदी गावरान पण चतुर महिला म्हणूनही शोभून दिसली आहे. तिच्या अभिनय क्षमतेचा नवा पैलू 'पा'नंतर इश्कियातून दिसला आहे. नसीरूद्दीन शहा यांचा तर काही जबाब नाही. अभिनयाच्या या खर्याखुर्या बादशहाबद्दल काय बोलायचं. दिल तो बच्चा है या त्यांच्यावर चित्रित गाण्यातून त्यांची देहबोली 'अनुभवावी' अशी आहे. अर्शद वारसीला त्याच्या 'सर्किट' या चिरपरिचित ओळखीतून बाहेर काढणारी व्यक्तिरेखा बब्बनच्या माध्यमातून मिळाली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 Response to "इश्किया- इश्क किया"
विशाल भारद्वाज सिंपली ग्रेट
Post a Comment