ब्रिटनचाही उत्तर भारतीय लोंढ्यांना रोखण्याचा निर्णय
उत्तर भारतातील 'विद्यार्थी व्हिसा' केंद्रे तात्पुरती बंद
नवी दिल्ली
मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरोधात ओरड होत असताना आता ब्रिटननेही आता 'उत्तर भारतातील विद्यार्थ्यांच्या' लोंढ्यांना रोखण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत ब्रिटनला जाण्यासाठी व्हिसा मागणार्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत अनैसर्गिक वाढ झाल्याचे दिसून आल्याने तेथून व्हिसासाठीचे अर्ज स्वीकारणे तात्पुरते थांबविण्यात आले आहे.
युके बॉर्डर एजन्सी ही ब्रिटनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी व्हिसाची परवानगी देणे तसेच त्यासाठीचे नियम व अटी तपासणारी संस्था आहे. या संस्थेने उत्तर भारतीयांच्या लोंढ्यांना रोखण्यासाठी नवी दिल्ली, चंडिगड आणि जालंधर येथील केंद्रे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
या वर्षी या भागातून ब्रिटनला जाण्यासाठी येणार्या अर्जांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. ही केंद्रे तात्पुरती बंद ठेवण्यात येणार असली तरी या काळात आलेल्या अर्जांची कठोर तपासणी केली जाईल. त्यामुळे ब्रिटनमध्ये कुणालाही अवैधरित्या घुसता येणार नाही, असे उपउच्चायुक्त नायजेल केसी यांनी सांगितले.
या केंद्रांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २००७ या काळात एक हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. २००८ मध्ये याच काळात ही संख्या १८०० वर गेली. परंतु, याच काळात गेल्या वर्षी तब्बल १३ हजार ५०० अर्ज आले.
प्रचंड संख्येने अर्ज करून घाईघाईत व्हिसा मंजूर करवून घेण्याचा काहींचा हा डाव असावा. विद्यार्थी व्हिसाच्या नावावर ब्रिटनमध्ये प्रवेश करायचा, असा काही मंडळींचा हेतू दिसतो आहे. पण तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे युके बॉर्डर एजन्सीचे प्रादेशिक संचालक ख्रिस डिक्स यांनी सांगितले.
उत्तर भारतातील काही एजंट काही मंडळींना विद्यार्थी व्हिसा काढून ब्रिटनला जाण्याचा मार्ग सुचवतात. तेथे जाऊन काही ना काही काम मिळेल असे अमीष दाखवतात. त्यामुळेच एवढ्या प्रचंड संख्येने अर्ज आले असावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. आमच्या तपासणीत योग्य त्या विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये येण्याची संधी मिळावी याची काळजी आम्ही घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
No Response to "ब्रिटनचाही उत्तर भारतीय लोंढ्यांना रोखण्याचा निर्णय"
Post a Comment