शाहरूख 'खान'वर शिवसेनेचा हल्लाबोल

Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk

click hereठाणे
अभिनेता व कोलकता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खानने आयपीएलच्या लिलावानंतर पाकिस्तानी खेळाडूंविषयी दाखवलेल्या सहानुभूतीने संतापलेल्या शिवसैनिकांनी आज ठाण्यात त्याच्या 'माय नेम इज खान' या आगामी चित्रपटाची पोस्टर्स फाडली. हा चित्रपट ठाण्यात प्रदर्शित करू नये असे निवेदनही त्यांनी मॉलच्या संचालकांना दिले.
यंदा आयपीएलच्या लिलावात एकाही पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावण्यात आली नाही. लिलावात उतरवूनही त्यांना घेण्यात कोणत्याही संघाने रस दाखविला नाही. त्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी हा आपल्या देशाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर शाहरूख खानने पत्रकार परिषद घेऊन या खेळाडूंविषयी सहानुभूती दाखवली होती. त्यांना घ्यायचेच नव्हते तर मग त्यांना लिलावात उतरवायला नको होते. त्यातून त्यांचा अपमान झाला आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली होती. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देणार नाही, या धमकीवरही त्याने नाराजी व्यक्त केली होती.

या प्रकरणावरून चिडलेल्या शिवसैनिकांनी आज ठाण्यात गोंधळ घातला. त्यांनी इटर्निटी या मॉलमध्ये धडक देऊन तिथे माय नेम इज खान या चित्रपटाची पोस्टर्स फाडली. तसेच हा चित्रपट ठाण्यात प्रदर्शित होऊ नये यासाठी मॉलच्या संचालकांना निवेदन दिले. आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

भारतातील दहशतवादी कृत्यात पाकिस्तानाचा सहभाग असतानाही त्या देशातील खेळाडूंबद्दल शाहरूखला एवढी सहानुभूती का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शाहरूखमधील 'खान' जागा झाला आहे. त्याने पाकिस्तानी  खेळाडूंविषयी दाखवलेली ही याच भावनेचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्याने पाकिस्तानी खेळाडूंना घेऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शाहरूख 'खान'वर शिवसेनेचा हल्लाबोल"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner