सानिया मिर्झाचे लग्न मोडले!
नवी दिल्ली
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे लग्न मोडले असून, तिच्या वडिलांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील वर्षात जुलै महिन्यात सानियाचा साखरपुडा तिचा बालमित्र आणि हैदराबादेतील बेकरी व्यावसायिक सोहराब मिर्झाशी झाला होता. सोहराब आपला बालमित्र असून, आपले त्याच्याशी चांगले जुळेल असे मत सानियाने यानंतर व्यक्त केले होते.
हे लग्न मोडल्याच्या वृत्ताला सानियानेही दुजोरा दिला आहे. मात्र, कारण सांगण्यास नकार दिला आहे. आम्ही गेल्या अर्धदशकापासून मित्र आहोत. पण साखरपुड्यानंतर मात्र आम्ही परस्परांस अनुरूप नाही याची जाणीव आम्हाला झाली. सोहराबला त्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा चिंतते असे सांगत तिने या विषयी अधिक काही बोलायला नकार दिला.
दोघांचा साखरपुडा झाला तेव्हाच उभयतांचा संसार सुखाचा होईल काय असे प्रश्न विचारले जात होते. सोहराबच्या तुलनेत सानिया लोकप्रिय आहे. शिवाय खेळाच्या निमित्ताने जगभरात फिरली आहे. त्यातूनच गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या नि सोहराबमध्ये मतभेद उत्पन्न झाल्याचे कळते. लग्नानंतर खेळायचे की नाही यावरूनही वाद असल्याचे समजते. सोहराबने हे सानियावर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले होते. तर लग्नानंतर आपण टेनिस खेळणे सोडणार असून, 2012 नंतर आपण लग्न करणार असल्याचे सानियाही नुकतेच सांगितले होते.
No Response to "सानिया मिर्झाचे लग्न मोडले!"
Post a Comment