दुसर्‍या हरितक्रांतीची गरज- राष्ट्रपती

Posted on Tuesday, January 26, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

देशात अन्‍नधान्याच्‍या वाढत्‍या किंमती व घटते उत्पादन हा चिंतेचा विषय असून आता दुसर्‍या हरित क्रांतीची गरज असल्‍याचे मत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केले आहे.
देशात खाद्यान्नाची मागणी वाढत आहे. जगात हेच चित्र आहे. अशा स्थितीत आपल्याला कृषी उत्पादन वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे पुरेसे धान्योत्पादन होऊ शकेल. विशेषतः ज्या धान्याचे उत्पादन लक्षणीयरित्या घटले आहे, त्यांचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे.

हे महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसर्‍या हरित क्रांतीची आवश्यकता आहे. नवे तंत्रज्ञान, सकस बियाणे, प्रगत कृषी तंत्र, प्रभावी जल संधारण यंत्रणा आणि याचबरोबर शेतकर्‍यांच्या आवश्यक गरजा भागविणारे तंत्रज्ञान विकसित करणारे शास्त्रज्ञ आणि त्यांना कर्ज देणार्‍या मजबूत व्यवस्थेची गरज आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

भारताचा विशाल विस्तार आणि लोकसंख्या पहाता सध्याच्या पायाभूत व्यवस्थेत बदलाची गरज त्यांनी व्यक्त केली. पुल, रस्ते, बंदरे, वीज उत्पादन क्षमता आणि परिवहन सुविधा यांत व्यापक परिवर्तनाची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.

देशात संरक्षणाचे नवीन धोरण गरजेचे असल्याचे सांगून अंतर्गत सुरक्षेचे आव्हान पेलण्यासाठी अत्यांतिक सावधगिरी बाळगून योग्य ती पावले उचलण्यासाठी आपण वचनबद्द असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "दुसर्‍या हरितक्रांतीची गरज- राष्ट्रपती"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner