माय नेम इज खानची चित्रपट समीक्षा
Posted on Tuesday, February 09, 2010 by maaybhumi desk
दिग्दर्शक : करण जौहर
कथा-पटकथा : शिबानी बाठिजा
गीत : निरंजन अय्यंगार
संगीत : शंकर-अहसान-लॉय
कलाकार : शाहरुख खान, काजोल, जिमी शेरगिल, झरीना वहाब
'माय नेम इज खान' हे वर्तमानाचे प्रतिबिंब आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरपराधांच्या बातम्या येत नाहीत, असा एकही दिवस जात नाही. प्रत्येक दिवसावर दहशतवादाची काळी छाया आहे. 9/11 नंतर जणू काही जग विभागले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर हा चित्रपट सर्व मुसलमान दहशतवादी नसतात हे ठामपणाने सांगतो. शिवाय शेवटी विजय भलाईचाच होतो हेही नमूद करतो. त्याचबरोबर शाहरूखमधील 'खान'ला वास्तवातही काय काय सहन करावे लागते त्याचे प्रतिबिंब म्हणजेही हा चित्रपट आहे.
'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटानंतर करणने चित्रपटाचा 'साचा' बदलला आहे. यावेळी पहिल्यांदाच त्याने वास्तववादी चित्रपटाचे आव्हान पेलले आहे. हा चित्रपट कुणाच्या बाजूने केलेला नाही. या चित्रपटाचा नायक म्हणतो, 'माझं नाव खान आहे, पण मी दहशतवादी नाही'. हा एक संदेश दोन्ही बाजूच्या लोकांना दिला आहे. प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतो, हे तो इतर धर्मियांना सांगतो तसेच मुस्लिम आहे, म्हणून दहशतवादी बनविता येणार नाही, असे कट्टरपंथीयांनाही ठणकावून सांगितले जाते. या मुद्यावर चित्रपट बनविणे तसे अवघड आहे, पण करणने चाकोरी सोडून केलेला प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय म्हणावा असा आहे. शाहरूख खान व काजोल यांचा कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट म्हणावा लागेल.
एक्स्पर्जर नावाच्या आजाराने ग्रासलेला चित्रपटाचा नायक रिजवान खान (शाहरूख खान) सन फ्रान्सिस्कोला भाऊ (जिमी शेरगिल) व वहिनीबरोबर रहायल जातो. मंदिराशी (काजोल) त्याचे प्रेम जमते. भावाचा विरोध पत्करून तो तिच्याशी लग्न करतो. मग दोघेही छोटासा व्यवसाय सुरू करतात. दोघांचेही छान चाललेले असते. इतक्यात ११ सप्टेंबरची 'ती' घटना घडते. त्यानंतर मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला जातो. मंदिराही त्याला सोडून निघून जाते. या घटनेने रिजवान खचतो, दुखावतो. पण मंदिराचे मन वळवून तिला घरी आणण्याचा चंग बांधतो. तिला प्राप्त करण्यासाठी तो अमेरिकेच्या अनोख्या प्रवासाला निघतो.
ही कथा सरळसोट नाही. त्यात बरीच वळणे आहेत. त्यामुळे एखादा प्रसंगही सुटला तर पुढे संगती लागत नाही. चित्रपटाच्या पहिल्या भागात बरेच काही घडते. त्यामुळे तो भाग चौकसपणे पहावा लागतो. चित्रपटाची गतीही एकसारखी नाही. कधी वेगवान तर कधी संथ हाताळणीमुळे त्या वेगाबरोबर स्वतःला ठेवावे लागते.
काही प्रसंग मात्र फारच छान जमले आहेत. शाहरूख व काजोलचे प्रणयप्रसंग मस्त रंगले आहेत. शाहरूख-काजोल व त्यांच्या मुलांदरम्यानची दृश्येही छान चित्रित झाली आहेत. 9/11 च्या घटनेनंतर बदललेल्या घटनांचे दुःखही प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचते.
नायक शाहरूख स्वतःच 'खान' असल्याने तो प्रेक्षकांना आपल्या नजरेतून चित्रपट पहायला लावतो. त्यामुळे त्याच्या बाबतीत होणार्या प्रत्येक दुःखद वा सुखद प्रसंगात प्रेक्षक त्याच्याबरोबर असतात. प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याचा भाग करण्याचे कसब शाहरूखने या चित्रपटात प्रभावीपणे साधले आहे. दुसरा भाग काहीसा कमकुवत आहे. पण तरीही चालण्यासारखा आहे.
या चित्रपटाची गाणी ऐका
दिग्दर्शक म्हणून करणची कामगिरी उजवी आहे. चकचकाटी चित्रपट सोडून त्याने केलेल्या प्रयत्नाबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. शिबानी बाठीजा यांची पटकथा बांधिव आहे. शिबानी व निरंजन अय्यंगार यांचे संवादही टोकदार आहेत.
शाहरूखचा हा कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय समजायला हरकत नाही. 'खान' या आडनावामुळे शाहरूखला चित्रपटात आणि बाहेरही किती सोसावं लागतं, ते त्याने प्रभावीपणे दाखवले आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेला वास्तववादी किनारही आहे. मंदिराच्या रूपात काजोलची निवड करणे यातच तिच्या भूमिकेचे यश सामावले आहे. सध्याच्या अभिनेत्री तिच्या आसपासही नाहीत, हे सिद्ध करणारी तिची भूमिका आहे. शाहरूख आणि काजोलची जोडी नेहमीच हिट ठरली आहे. यावेळीही अपवाद नसेल. बाकीच्या कलावंतांची कामेही उत्तम आहेत.
माय नेम इज खान ही धार्मिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेम कथा आहे. त्यात मनोरंजनाबरोबर वास्तवाची कठोर जाणीवही आहे. त्यामुळे जवळपास अडीच तास तुम्ही त्यात गुंतून आणि गुंगून जाल हे नक्की.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "माय नेम इज खानची चित्रपट समीक्षा"
Post a Comment