सरकारने काश्मीरवरील नियंत्रण गमावलेः गडकरी
Posted on Wednesday, February 17, 2010 by maaybhumi desk
इंदूर (कुशाभाऊ ठाकरे नगर)
केंद्रातील कॉंग्रेस सरकार अमेरिकेच्या दबावाखाली येऊन पाकिस्तानशी चर्चा करत असून घाई गडबडीत अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. सरकारच्या या चुकीच्या निर्णयांमुळे काश्मीरवरून आपले नियंत्रण सुटत चालले असल्याचा धोक्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला.बंद दरवाज्या आड झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी बैठकीबाबतची माहिती पत्रकारांना दिली.गडकरी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानशी संबंध, दहशतवाद, नक्षलवाद आणि महगाई या मुद्यांवर आपले मत प्रदर्शित केले.
कॉंग्रेसच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देण्यासारख्या अनेक घटना घडल्याचा आरोप भाजपने केला असून पुणे बॉम्ब स्फोटामुळे दहशतवादी सहज असले हल्ले घडवून आणू शकतात हे सिध्द झाले आहे, असे असताना सरकार केवळ मतांचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करण्याच्या निर्णयावरही पक्षाने नाराजी व्यक्त केली असून मुंबई हल्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात असल्याचे पुरावे दिल्यानंतरही पाकने त्यावर कुठलीही भरीव कारवाई केलेली नाही. तर दुस-या बाजूला कॉंग्रेसचे काही मंत्री बाटला हाऊसमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांच्या घरी जाऊन सहानुभूती व्यक्त करत आहेत. अशा स्थितीत पाकशी अमेरिकेच्या दबावाखाली चर्चा करून सरकार काश्मीरवरचे भारताचे नियंत्रण गमावत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "सरकारने काश्मीरवरील नियंत्रण गमावलेः गडकरी"
Post a Comment