राज ठाकरे यांच्‍यावर राज्यभरात 73 खटले

Posted on Sunday, March 07, 2010 by maaybhumi desk

मुंबई


महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍यावर राज्यभरात 73 वेगवेगळे खटले दाखल करण्‍यात आली असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेल्‍वे परीक्षे दरम्यान उत्तर भारतीयांना झालेल्‍या मारहाणीबद्दल राज ठाकरे यांना अटक करण्‍यात आली होती. त्‍या घटनेमुळे राज्यभर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. त्‍या प्रकरणी राज यांच्‍यावर हे खटले दाखल करण्‍यात आले आहेत.


राज यांना 73 पैकी सहा खटल्‍यांमध्‍ये जामीन मिळाला असून उर्वरित खटल्‍यांबद्दल अद्याप न्‍यायालयासमोर सुनावणी झालेली नाही.


यापूर्वी राज यांना जळगाव जिल्‍ह्यातील भडगाव व चोपडा न्‍यायालयाकडून तसेच औरंगाबाद जिल्‍ह्यातील गंगापूर येथे असलेल्‍या चार खटल्‍यांप्रकरणी जामीन मिळाला आहे. राज यांच्‍या या खटल्‍यांसंदर्भात प्रख्‍यात कायदेतज्‍ज्ञ सयाजी नागरे हे त्‍यांचे वकील म्हणून काम पाहत आहेत. राज यांनी 22 फेब्रुवारी रोजी चोपडा न्‍यायालयात हजेरी लावल्‍यानंतर त्‍यांना न्‍यायालयाने जामीन मंजूर केला आहे.


जालना जिल्‍ह्यातील बळनापूर न्‍यायालयाने बजावलेल्‍या अजामीनपात्र वॉरंटला आव्‍हान देणारी याचिका राज यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. उर्वरित 73 खटल्‍यांमध्‍ये राज यांच्‍यावर लावण्‍यात आलेले आरोप आणि या खटल्‍यातील आरोप यात साम्‍य असूनही अजामीनपात्र वॉरंट बजावल्‍याप्रकरणी त्यांनी आव्‍हान दिले होते. त्‍यावर सुनावणी करताना न्‍यायालयाने हे वॉरंट रद्द ठरविले आहे.


दरम्‍यान, राज्यात घटलेल्‍या तोडफोडीच्‍या सर्व घटनांच्‍या वेळी राज ठाकरे हे तुरूंगात असल्‍याने त्‍यांच्‍यावर जमावास चिथावणी दिल्‍याचा आरोप सिध्‍द होऊ शकत नाही. तसेच राज्यात उसळलेल्‍या उद्रेकासही त्यांना जबाबदार धरता येणार नाही. असा युक्तीवाद एड.सयाजी नागरे यांनी केला आहे.


राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांविरोधात चिथावणीखोर वक्तव्‍य करून राज्यातील शांतता भंग केल्‍या प्रकरणी रत्‍नागिरी येथून 21 ऑक्‍टोबर 2008 रोजी अटक करण्‍यात आली होती. त्‍यानंतर राज समर्थकांनी राज्यभर आंदोलन करून तोडफोड केली होती.


यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्‍या बसेससह सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राज ठाकरे यांच्‍यावर राज्यभरात 73 खटले"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner