मतासाठी ब्लाउजमधून 'लाच'
बंगळुरू
आपल्या देशातल्या राजकारण्यांनी लाज सोडली आहे ही बातमी तशी जुनी झाली मात्र आता मतांची भीक मागायला येणा-या याच नेत्यांनी स्त्री-दाक्षिण्यही सोडल्याची नवीच बाब समोर आली आहे. बंगळुरू महापालिकेच्या निवडणुकी दरम्यान ही घटना घडली आहे. महापालिकेसाठी रविवारी मतदान झालं यावेळी गुपचूप मतं मागण्यासाठी आलेल्या या नेत्याने एका महिला मतदाराला काही पैशांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्या स्त्रीने नाकारताच या नेत्याने सर्व मर्यादा पार करत या महिलेच्या ब्लाऊजमध्ये हात घालून दोन हजार रुपये ठेवले.
या संदर्भात एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार बंगळुरू महापालिकेच्या मतदाना दरम्यान येथील जरगनहाली वॉर्डातील एका नेत्याने आपल्या पत्नीच्या प्रचारा दरम्यान आपल्या भागातील महिला मतदारांना आपल्या घरी बोलावून पैसे वाटले. यावेळी तिथे एका महिलेला या नेत्याने पैसे देण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने ते घेण्यास नकार दिला असता या नेत्याने चक्क या महिलेच्या ब्लाऊजमध्ये हात घालत त्यात दोन हजार रुपये ठेवले.
या घटनेनंतर तिथे उपस्थित शेकडो महिलांनी या नेत्याची यथेच्च धुलाई केली असून या नेत्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.