साहित्‍य ऋषी विंदांचे निधन

Posted on Sunday, March 14, 2010 by maaybhumi desk

मुंबई

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय,
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव !
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्‍वास.
विसर यांना दाब कढ;
माझ्या मना बन दगड !
vdkarandikar या ओळींनी मराठी मनावर दीर्घकाळ गारूड करणारे ज्‍येष्‍ठ कवी विंदा करंदीकर यांचे आज मुंबईतील भाभा रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या 'अष्टदर्शने' या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्‍कार प्रदान करण्यात आला होता. ऋषितुल्‍य व्‍यक्तीमत्‍व लाभलेल्‍या विंदांच्‍या काव्‍य वाचनाने पुण्‍यातील आगामी साहित्‍य संमेलनाचे उदघाटन होणार होते. मात्र ही इच्‍छा आता अपूर्णच राहणार आहे. 


विंदांच्‍या जाण्‍याने साहित्‍य वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून उद्या सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या 'साहित्य सहवास' या घरी ठेवण्यात येणार आहे. विंदांच्‍या इच्‍छेनुसार मृत्युनंतर त्यांचे शरीर दान करण्‍यात येणार आहे. 

विंदांनी नुसत्याच कविता लिहिल्या नाहीत तर आपल्या जीवनात त्याचा आनंदही घेतल्याचे मत प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या कवितांचा कॅन्व्हॉस खूपच व्यापक असल्याची प्रतिक्रियाही म्हात्रे यांनी दिली आहे. 

विंदांना केवळ मराठी कवी म्हणणे चुकीचे असून, ते जागतिक पातळीवरील मोठे कवी होते अशी प्रतिक्रिया 2008 मधील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध हिंदी कवी कुंवर नारायण यांनी दिली आहे. 

विंदांच्या लेखनात नावीन्य होते. त्यांनी केवळ गंभीर लिखाणंच केले नाही तर लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या कविताही प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले. विंदांच्या निधनाने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचे मत ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताळे यांनी व्यक्त केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "साहित्‍य ऋषी विंदांचे निधन"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner