राजस्थानच्या पराभवाची आणि प्रवीण कुमारची ‘हॅटट्रिक’

Posted on Friday, March 19, 2010 by maaybhumi desk

बंगळुरू

अनिल कुंबळेच्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने गुरुवारी शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सचा ‘खात्मा’ केला.  पहिल्या मोसमात जेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घालणार्‍या राजस्थान रॉयल्सचा आयपीएलच्या तिसर्‍या मोसमातील हा सलग तिसरा पराभव. प्रवीण कुमारने सतराव्या षटकात डॅमियन मार्टिन, सुमीर नरवाल आणि पारस डोग्राला बाद करीत हॅटट्रिक साजरी केली. यानंतर राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 93 या माफक धावसंख्येचा पाठलाग करणार्‍या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने 10 गडी व 56 चेंडू राखून दणदणीत विजय संपादन केला. मनीष पांडे आणि जॅक कॅलिस यांनी प्रत्येकी नाबाद 42 आणि 44 धावा चोपून काढत बंगळुरूच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले.



दरम्यान, याआधी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिल्या दोन लढतींमध्ये पराभूत झालेल्या राजस्थान रॉयल्सच्या सलामीच्या फलंदाजांनी सावध पवित्रा घेतला. नमन ओझा व मायकेल लम्ब ही जोडी स्थिरावतेय असे वाटत असतानाच या स्पर्धेत आपला ठसा उमटवणार्‍या कॅलिसने ओझाला 16 धावांवरच रॉबिन उत्थप्पाकरवी झेलबाद केले.

यानंतर राजस्थान रॉयल्सचा डाव सावरलाच नाही. लम्ब (10 धावा), मार्टिन (19 धावा), अभिषेक झुनझुनवाला
(5 धावा), पारस (3 धावा), सुमित (0) आणि शेन वॉर्न (4 धावा) या फलंदाजांनी एकापाठोपाठ असा पॅव्हेलियनचा रस्ता पकडला. मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूंमध्ये तुफानी शतक झळकावणार्‍या युसूफ पठाणने 24 चेंडूंत 2 षटकार व 1 चौकारांनिशी 26 धावा चोपून काढत कडवी झुंज दिली पण विराट कोहलीने त्याला धावचीत करीत राजस्थान रॉयल्सच्या आशांना सुरुंग लावला.

प्रवीण कुमारने अवघ्या 18 धावांत 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. कॅलिसने 20 धावा देत ओझा व नझुनवालाला
बाद केले, तर कर्णधार कुंबळेने फक्त 9 धावा देत राजस्थान रॉयल्सच्या तळाच्या फलंदाजांना आपले पाय पसरू दिले नाहीत.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राजस्थानच्या पराभवाची आणि प्रवीण कुमारची ‘हॅटट्रिक’"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner