पीसीबीचा खेळाडूंवर बडगा आणि पुन्‍हा सावरासावर

Posted on Thursday, March 11, 2010 by maaybhumi desk

कराची


ऑस्ट्रेलिया दौ-यात नामुष्कीजन्य पराभव पत्कराव्‍या लागलेल्‍या खेळाडूंवर संतापलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शिस्तभंगाचे कारण पुढे करत संघातील तगड्या खेळाडूंवर कठोर कारवाई केली असून या निर्णयामुळे अर्धा संघ पॅव्‍हेलियनमध्‍ये परतला आहे. तर कर्णधार मोहम्मद युसूफ आणि माजी कर्णधार युनूस खान यांच्यावर लावण्‍यात आलेली आजीवन बंदी रात्री उशीरा मागे घेण्‍यात आली आहे. कारवाई करण्‍यात आलेल्‍या खेळाडूंमध्‍ये राणा नावेद उल हसन, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, कमरान अकमल आणि उमर अकमल यांचाही समावेश आहे.



ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पाकिस्तान संघाच्‍या निराशाजनक कामगिरीनंतर नेमलेल्या चौकशी समितीने खेळाडूंवर मोठ्या दंडाची आणि बंदीची शिफारस सुचविली होती. खेळाडूंवर आचारसंहिता भंग आणि आपसातील वाद हा या पराभवाचे कारण असल्‍याचा ठपका समितीने ठेवला असला तरीही मॅच फिक्सिंगच्‍या आरोपामुळे ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे.


शाहिद आफ्रिदी, कमरान अकमल आणि उमर अकमल यांना आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 20 ते 30 लाख रुपये दंड करण्यात आला. तसेच या तिघांना शेवटची संधी दिली गेली असून सहा महिने त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर मोहम्मद युसूफ व युनूस खान यांच्‍यावर सुरूवातीला आजन्‍म बंदी घालण्‍यात आल्याचे जाहीर केले. मात्र रात्री उशीरा पीसीबीचे अध्यक्ष इजाज बट यांनी असा निर्णय झालाच नसल्याचे सांगत, 'युसुफ आणि युनुसवरील कारवाईबाबतचा भाग वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केला. मात्र या दोघांवरही आजन्म बंदीची सूचना चौकशी समितीने केलीच नसल्‍याचे म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात पाककडून खेळण्याचा या खेळाडूंचा मार्ग मोकळा झाला आहे.'


सिडनी कसोटीत कामरान अकमलने सोपे झेल सोडले होते. त्यानंतर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले. त्याला शेवटच्या कसोटीतून वगळण्यात आले. मॅच फिक्सिंगमध्ये पाकच्या दोन खेळाडूंचे नाव गेल्या काही‍ दिवसांपासून तेथील माध्यमांमध्ये येत होते.


दरम्यान, पीसीबीचे माध्यम व्यवस्थापक नदीम सर्वर म्हणाले, की खेळाडूंना झालेली शिक्षाचा मॅच‍ फिक्सिंगशी संबंध नाही. आचारसंहिता भंगमुळे ही कारवाई झाली आहे. खेळाडू पीसीबीच्या निर्णयाविरुद्ध अध्यक्षांकडे दाद मागू शकतात.


बोर्डाच्‍या या निर्णयामुळे पाकचा अर्धा संघ संपुष्‍टात आला असून यातून सावरण्‍यासाठी पाक क्रिकेटला बराच काळ संघर्ष करावा लागणार आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पीसीबीचा खेळाडूंवर बडगा आणि पुन्‍हा सावरासावर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner