अविश्वास प्रस्तावावर यादवद्वय एक पाऊल मागे!
Posted on Wednesday, March 10, 2010 by maaybhumi desk
लालूप्रसाद आणि मुलायमसिंह या यादवांनी आता सरकार खाली खेचण्याचा उद्योग तूर्तास गुंडाळून ठेवला आहे.
सदस्यांचे गणित बाजूने नसल्याने यादवद्वयांना माघार घ्यावी लागली आहे. मुलायमसिंह यादवांनी त्याची स्पष्ट कबूली दिली. 'आत्ता हे शक्य नाही. आधी आमच्यात त्याची चर्चा व्हायला हवी.

त्यानंतरच अविश्वास प्रस्ताव आणण्याचा आम्ही विचार करू. पण आत्ता आमच्याकडे पुरेसे सदस्य नाहीत, असे ते म्हणाले. समाजवादी पक्षाकडे सध्या फक्त २१ खासदार आहेत. सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासंदर्भातही ते 'मुलायम' झाल्यासारखे वाटले. यासंदर्भात राष्ट्रपतींना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, अविश्वास प्रस्तावासंदर्भात लालूप्रसाद यादवांनाही विचारले असता, आमचे लोकसभेत जेमेतम चार सदस्य आहेत. त्यामुळे असा काही आमचा विचार नाही, असे सांगत त्यांनी हा प्रश्नच झटकून टाकला. अविश्वास आणण्याची चर्चा ही चुकीची माहिती असल्याची मखलाशीही त्यांनी केली. पण हा प्रस्ताव आणण्याची चाचपणी यादवद्वयांनी आधी करून पाहिली होती.
या ठरावाला पाठिंबा द्याव यासाठी भारतीय जनता पक्षासह राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंग, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे देवेगौडा, शिवसेना व अकाली दलाला विश्वासात घेतले जात होते. अर्थात, भाजपने या कटात सामील व्हायला स्पष्ट नकार दिला. सरकारला या मुद्यावरून खाली खेचण्यात अर्थ नाही, असे भाजप नेतृत्वाचे मत होते. शिवाय त्यानंतर निवडणुका झाल्याच तर त्याचा फायदा या यादव द्वयांना मिळण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे भाजपने या ठरावापासून दूर रहायचे ठरवले.
हा ठराव सादर करण्यासाठी सपा आणि राजदला पन्नास सदस्यांची गरज होती. तेवढे सदस्यही जमविणे शक्य नसल्याचे लक्षात येताच माघार घेण्यात आली. मात्र, आता वित्त विधेयक मंजूर करताना सरकारची कोंडी करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "अविश्वास प्रस्तावावर यादवद्वय एक पाऊल मागे!"
Post a Comment